तालुका कृषी कार्यालयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:21 AM2019-04-18T00:21:58+5:302019-04-18T00:23:05+5:30
शहरातील आनंद नगर परिसरात अंबाजोगाई तालुका कृषी कार्यालयाची इमारत दुसऱ्या मजल्यावर आहे. या इमारतीला मंगळवारी रात्री ११.३० वाजता अचानक आग लागली.
अंबाजोगाईत : शहरातील आनंद नगर परिसरात अंबाजोगाई तालुका कृषी कार्यालयाची इमारत दुसऱ्या मजल्यावर आहे. या इमारतीला मंगळवारी रात्री ११.३० वाजता अचानक आग लागली. या आगीची माहिती प्राप्त होताच अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवली. मात्र, तोपर्यंत कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले.
मंगळवारी रात्री ११.३० नंतर अंबाजोगाई तालुका कृषी कार्यालयाच्या इमारतीतून आगीचे लोळ व धुराचे लोट दिसू लागले. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती कृषी अधिकारी पोलिसांना दिली. नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या बंबाला तात्काळ येथे पाचारण करण्यात आले. अर्ध्या तासात लागलेली आग विझविताना अग्निशामक दलाला यश प्राप्त झाले. कृषी कार्यालयाच्या दुसºया मजल्यावरील इमारतीत एकूण सात खोल्या आहेत. यापैकी एका खोलीमध्ये दोन कपाट व कपाटावरील दस्तावेज जळून खाक झाले. तात्काळ आग विझविण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. टेबल, खुर्च्या व दोन कपाट या आगीत जळून खाक झाले आहेत. जळालेल्या कागदपत्रांमध्ये सांख्यिकीचे रेकॉर्ड, अपघात विमा यांची अनेक कागदपत्रे होती. या लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. ही आग कशी लागली? याचे रहस्य मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांच्याकडे विचारणा केली असता आगीत एका रूममधील दोन कपाट व टेबल खुर्च्या जळाल्याचे त्यांनी सांगितले. जे रेकॉर्ड जळाले आहे. ते संगणकावर आॅनलाईन असल्याने परत मिळू शकते. कार्यालयातील बहुतांश कर्मचारी मतदान यंत्रणेत असल्याने कार्यालयात मंगळवारी दिवसभर कोणी नव्हते. पोलिसांच्या वतीने पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.