कामावरून काढलेला नोकरच मास्टरमाईंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:51+5:302021-09-07T04:40:51+5:30
बीड : चोरी करताना दोन ते तीन वेळा पकडले, समज देऊनही वर्तनात सुधारणा न झाल्याने मालकाने कामावरून कमी केले. ...
बीड : चोरी करताना दोन ते तीन वेळा पकडले, समज देऊनही वर्तनात सुधारणा न झाल्याने मालकाने कामावरून कमी केले. चोरीची चटक लागलेल्या नोकराने चार मित्रांसोबत रोकड लुटण्याचा प्लॅन करून तो यशस्वीही केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस एक करत अवघ्या २४ तासांत टोळीचा पर्दाफाश केला. मास्टमाइंडने लुटीचा थरारपट पोलिसांसमोर उलगडला. सध्या पाचही जण जेलची हवा खात आहेत.
येथील बाह्यवळण रस्त्यावरील बहिरवाडी शिवारात खवा व्यापाऱ्याच्या जीपला कार आडवी लावून २ लाखांची रोकड पळविल्याची घटना ४ सप्टेंंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. केज तालुक्यातील विशाल डेअरीचे व्यवस्थापक अनिरुद्ध मुळे व चालक हे मालवाहू जीपमधून खवा व केक वितरित करून जालन्याहून केजकडे परतत होते तेव्हा कार आडवी लावून दमदाटी करत १ लाख ९५ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, सहायक उपनिरीक्षक हनुमंत खेडकर, मनोज वाघ, राहुल शिंदे, विकास वाघमारे, चालक दीपक रहीकवाल यांचे पथक रवाना केले. या पथकाने धनराज विश्वनाथ ठोंबरे (३१), चांगदेव लक्ष्मण भांगे (२४), शरद राजेंद्र घोळवे (२३, तघे रा. सारणी सांगवी, ता. केज) , जुबेर आयुब आतार (२९,रा. मल्टन ता. शिरूर, जि. पुणे), तुषार संपत गुंजाळ (२३, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथून मुसक्या आवळल्या. यातील धनराज ठोंबरे हा विशाल डेअरीमध्ये चालक म्हणून कामाला होता. दोन वेळा डिझेल चोरी तर एकदा खव्याच्या पाकिटांमध्ये अफरातफर करताना त्यास रंगेहात पकडले होते. समज देऊनही त्याच्यात सुधारणा न झाल्याने त्यास कामावरून काढले होते. पैशाच्या मोहापायी त्याने चार मित्रांच्या मदतीने जालन्यापासून पाठलाग करून रोकड लुटली. यावेळी तो व अन्य एक कारमध्येच होते तर अन्य तिघांनी खाली उतरून दाबदडप केली.
.....
किरायाच्या कारमधून गुन्हा
गुन्ह्यात वापरलेली कार टुर्स कंपनीकडून किरायाने घेतली. विवाहाकरिता मुलगी पाहायला जाण्यासाठीचे भाडे आहे, असे सांगून जुबेर आतार याने कारची तजवीज केली.
धनराज ठोंबरे याच्या गावातील काही तरुण पुण्यात असतात. त्यांच्या मदतीने रोकड लुटून सगळेच पुण्याला गेले होते.
....