गुटख्याच्या काळ्या बाजारातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:27 PM2017-11-22T23:27:48+5:302017-11-22T23:27:52+5:30
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील देविदास मुंडे याच्यावर झालेला गोळीबार हा गुटख्याच्या वादातूनच झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गोळीबार करणारा हा गुटख्याचा काळाबाजार करणारा असून संदीपान केंद्रे त्याचे नाव आहे. पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीड : परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील देविदास मुंडे याच्यावर झालेला गोळीबार हा गुटख्याच्या वादातूनच झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गोळीबार करणारा हा गुटख्याचा काळाबाजार करणारा असून संदीपान केंद्रे त्याचे नाव आहे. पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
परळी तालुक्यातील जिरेवाडी परिसरात देविदास मुंडे याच्या शेतात मध्यरात्री संदीपान केंद्रेने गुटख्याच्या वादातून गोळीबार केला होता. यामध्ये मुंडे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहा.पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी याप्रकरणात लक्ष घातले. मुुंडेचा जबाब घेतला. मुंडेचा गुटख्यातील काळाबाजारात सहभाग असल्याने त्याने खरी माहिती पोलिसांपासून लपवली. पोलिसांनी मुंडेला विश्वासात घेतले. त्यानंतर त्याने खरा प्रकार सांगितला. त्याप्रमाणे त्याच्या फिर्यादीवरून परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, मुंडे व केंद्रे हे गुटख्याचा काळाबाजार करीत असल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहे. केंद्रे हा मुंडेला कमी पैशात जास्त गुटखा देत होता. घटनेच्या दिवशीही असेच ठरले होते. मात्र त्यांच्यात वाद झाला व मुंडेवर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला
आहे.
पोलिसांचा तपास यशस्वी
फिर्यादी मुंडे हा पोलिसांची दिशाभूल करीत होता. त्यामुळे मुख्य आरोपीपर्यंत पोहचणे अवघड बनत होते. अखेर आपल्या क्लृप्त्यांच्या आधारे त्यांनी याचा छडा लावला. बोराडे यांनी आपल्या पथकामार्फत मंगळवारी मध्यरात्री आरोपी केंद्रेच्या मुसक्या आवळल्या.