उसने ५० हजार रुपये देण्यास नकार दिल्याने परळी तालुक्यात गोळीबार
By सोमनाथ खताळ | Published: August 4, 2024 12:06 AM2024-08-04T00:06:23+5:302024-08-04T00:06:36+5:30
प्रकाश अशोक मुंडे याच्याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ८.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी (जि.बीड) : मला पैसे दे नाहीतर खल्लास करतो, अशी धमकी देऊन नाथरा येथील एकाच्या कानाजवळ पिस्तूल लावला. त्यानंतर गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हा प्रकार परळी तालुक्यातील नाथरा गावाजवळील सोनपेठ रस्त्यावर शनिवारी दुपारी ३ वाजता घडला. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेतीच्या कामासाठी आणलेले ५० हजार रुपये पाहून नाथरा येथील महादेव केशव मुंडे (वय ३७) यांना प्रकाश अशोक मुंडे याने ऊसने ५० हजार रुपये मागितले. हे पैसे देण्यास नकार दिल्याने महादेव मुंडे यांच्या कानाला गावातीलच प्रकाश मुंडे याने गावठी पिस्तूल लावला. गोळीबार करत असतानाच महादेव मुंडे यांनी प्रसंगावधनता बाळगली आणि प्रकाशच्या हाताला झटका मारला. त्यामुळे महादेव मुंडे बचावले. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश अशोक मुंडे याच्याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ८.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्यासह अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.