परळीत सिगारेटचे पैसे मागितल्याने हॉटेल मॅनेजरवर गोळीबार; थोडक्यात जीव बचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:04 PM2023-08-10T15:04:43+5:302023-08-10T15:05:23+5:30
याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत
परळी( बीड) : येथील कन्हेरवाडी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये येऊन चौघाजणांनी सिगारेटचे पॉकेट मागितले. तेव्हा सिगारेट पाकिटाचे 150 रुपये मागितले असता मॅनेजरला चौघा जणांनी मारहाण करत हॉटेलमध्ये पिस्तूलने दोन गोळ्या झाडल्याची थरारक घटना. गोळीबारात मॅनेजर थोडक्यात बचावला. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.
मिळालेली माहिती अशी की, परळी- कन्हेरवाडी रोडवर विलास आघाव यांचे हॉटेल यशराज आहे. या हॉटेलमध्ये ९ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा ते पावणे अकराच्या सुमारास चौघे अनोळखी इसम आले. त्यांनी हॉटेल मॅनेजर नरेश निशादला सिगारेटचे पॉकेट मागितले. पॉकेटचे 150 रुपये द्या, असे म्हटल्याने चौघेजण संप्तत झाले. त्यांनी मॅनेजर नरेश निसादला शिवीगाळ करून ग्लास,बताईने मारहाण केली. तसेच मॅनेजर नरेशवर पिस्तुलाने फायरिंग केली. सुदैवाने मॅनेजर यातून बचावला.
हा थरारक प्रकार घडल्यामुळे परिसरात दहशत माजली आहे. या प्रकरणी हॉटेलचे मालक विलास आघाव यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चौघा जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके नियुक्त केले आहेत.
आज अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर ,अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चाऊस ,परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, नारायण गीते ,पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, भक्तराम गीते ,पोलीस सुनील अन्नमवार ,नवनाथ हरगावकर व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.