शाळा अन् शिक्षक न पाहताच पहिलीतील मुले गेली दुसरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:49+5:302021-04-14T04:30:49+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन लागले. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच गेला. परिणामी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन लागले. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच गेला. परिणामी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले. मध्यंतरीच्या काळात काही दिवस कोरोनाची स्थिती सुधारल्याने इयत्ता दहावी व बारावीच्या तासिका कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यात आल्या. पुन्हा कालांतराने इयत्ता आठवी, नववी व इयत्ता पाचवीपर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यात आली. मात्र, वर्षभरात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरूच झाले नाहीत. या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले.
ग्रामीण भागातील बऱ्याच कुटुंबांतील पालकांना आजही स्मार्ट फोन कसा हाताळला जातो? याचे ज्ञान नाही आणि सर्व शिक्षण तर ऑनलाईन झाले आहे. शहरी भागात विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण मिळते, तशी स्थिती ग्रामीण भागात नाही. ज्या पालकांकडे मोबाईल आहेत. त्यांच्या मोबाईलला रेंज नसल्याने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. पालकही या बाबींंकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे याचा मोठा फटका ग्रामीण भागातील मुलांना बसला आहे. आणखी अशी स्थिती राहिली, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.