बीड जिल्ह्यात ८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 03:00 PM2020-11-05T15:00:53+5:302020-11-05T15:01:41+5:30
शासकीय, खाजगी डॉक्टर, परिचारिका, आशाताई, कर्मचाऱ्यांचा समावेश
बीड : कोरोनाची रुग्णसंख्या आणि भिती कमी होत असल्याचे दिसत आहे. जागतिक पातळीवर कोरोना प्रतिंधासाठी लस तयार करण्यात येत आहे. पुढील काही महिन्यात ती प्रत्यक्षात देण्यातही येणार आहे. याचा पहिला मान या लढ्यात सर्वात पुढे होऊन काम करणाऱ्या आरोग्य विभागातील योद्धांना असणार आहे. जिल्ह्यात खाजगी व शासकीय असे जवळपास साडे सात ते आठ हजार अधिकारी, कर्मचारी आहेत.
या सर्वांची माहिती संकलीत करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. राज्य शासनाच्या सुचनेनुसार संबंधितांची माहिती जमा केली जात असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना परतीच्या मागार्वर
मागील काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार ५९१ असली तरी ॲक्टीव्ह बाधितांची संख्या हजाराच्याखाली आल्याने दिलासा मिळाला आहे.
लस येईल तेव्हा...
लस कधी येणार हे अद्याप निश्चीत नसले तरी ती लवकरच येण्याचे संकेत आहेत. लस आल्यानंतर पहिला मान आरोग्य कर्मचाऱ्यांना असेल. त्यानंतर नागरिकांनाही दिली जाणार असल्याचे समजते. लस येताच आरोग्य विभागाने ती प्रत्येकाला मिळेल, याचे नियोजन करावे.
कोणाला मिळणार लस?
शासकीय कर्मचारी : डाॅक्टर, नर्स, आशाताई, अंगणवाडी सेविका यांना कोरोना लस पहिल्यांदा दिली जाणार आहे. जिल्हाभरात यांची संख्या जवळपास सहा ते साडेसहा हजारापर्यंत आहे. त्या सर्वांची माहिती संकलीत केली जात आहे. दुसऱ्या टप्यात पोलीस, महसूल, पत्रकार, शिक्षक यांनाही ही लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
खासगी कर्मचारी : जिल्हयात ४८४ खाजगी रुग्णालये आहेत. त्यांच्याकडे अधिकृत नोंदणी असलेले जवळपास एक ते दीड हजार कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा स्तरावर काय तयारी सुरू आहे?
आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसह खाजगी रुग्णालये, सर्व आरोग्य संस्थांकडून माहिती संकलीत केली जात आहे. संस्था प्रमुखांकडून कर्मचाऱ्यांचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड आदिंची माहिती जमा केली आहे. खाजगी डॉक्टरांना पत्र देऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांचीही यादी मागविली जात आहे. सर्व माहिती जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली असून त्यांना गतीने संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना लसीच्या अनुषंगाने शासकीय व खाजगी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत केली जात आहे. जिल्हयात जवळपास साडे सात ते आठ हजार लोक आहेत. आठवडाभरात सर्व माहिती जमा होईल.
- डॉ.आ.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड