गेवराईत पहिल्या दिवशी ७८ जणांना कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:29 AM2021-01-17T04:29:14+5:302021-01-17T04:29:14+5:30
गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असून, पहिल्या दिवशी ७८ जणांना ही लस ...
गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असून, पहिल्या दिवशी ७८ जणांना ही लस देण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी दिली. देशभरात सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेत बीड जिल्ह्यात १७ हजार ६०० लसींचे डोस उपलब्ध झाले असून, गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात एकूण १८०० लसींचे डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंगेश खरात व वैशाली रावसाहेब यांना पहिली लस टोचून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी आ. लक्ष्मण पवार, तहसीलदार सचिन खाडे, डॉ. चिंचोळे, भूलतज्ज्ञ डॉ. राजेश शिंदे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष ॲड. राजेंद्र राक्षसभुवनकर, डॉ. सराफ, डॉ. रांदड, डॉ. राजेंद्र आंधळे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सर्वोत्तम शिंदे, डॉ. मंत्री, डॉ. आबेद जमादार, आदी उपस्थित होते. धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
रोज १०० जणांचे लसीकरण
दिवसभरात एकूण ७८ जणांना ही लस देण्यात आली. येथील रुग्णालयात नोंदणीनुसार रोज १०० जणांना ही लस टोचली जाणार असून पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे भूलतज्ज्ञ डॉ. राजेश शिंदे यांनी सांगितले. या मोहिमेसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने पाच ते सहा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह मदतनीस कर्मचारी व व्हेंटिलेटरसारख्या सुविधा सज्ज करून ठेवल्याची माहिती डॉ. चिंचोळे यांनी दिली.