माजलगावात पहिल्या दिवशी लाॅकडाऊनचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:54+5:302021-04-16T04:33:54+5:30
माजलगाव : महाराष्ट्र शासनाने गुरुवारपासून लागू केलेल्या लाॅकडाऊनचा पूर्णपणे फज्जा उडाला. परवानगी नसतानाही अनेक दुकाने उघडी दिसत होती. ...
माजलगाव
: महाराष्ट्र शासनाने गुरुवारपासून लागू केलेल्या लाॅकडाऊनचा पूर्णपणे फज्जा उडाला. परवानगी नसतानाही अनेक दुकाने उघडी दिसत होती. तर नागरिक मात्र बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत असताना दिसत होते.
गुरुवारपासून शासनाने संचारबंदी लावत केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्या व्यापारास सूट दिली होती; परंतु गुरुवारी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवेबरोबरच ज्या व्यापाऱ्यास दुकाने उघडण्याची परवानगी नसताना येथील अनेक व्यापाऱ्यांनी सुरुवातीला अर्धे शटर उघडले व नंतर कोणीच काही म्हणत नसल्यामुळे या व्यापाऱ्यांनी दुकानाचे संपूर्ण शटर उघडून ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मोंढ्यात पत्र्याची दुकाने, होलसेल जनरल दुकाने, पाणटपऱ्या, मुख्य रस्त्यावरील अनेक फर्निचर, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक, कपडा व सोन्याचे दुकानदार ग्राहकांना आतमध्ये घेऊन शटर बंद करताना दिसत होते. काही दुकाने पाठीमागील दारावाटे खुल्लेआम चालूच होती. हे होत असताना यांना ना पथकाने हटकले, ना पोलिसांनी. यामुळे या व्यापाऱ्यांचे फावले. मात्र, शासनाने हा लाॅकडाऊन कडक करावा व जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाया कराव्यात, असे आदेश असताना व शासनाने लावून दिलेल्या नियमांची प्रशासन व पोलिसांनीच पायमल्ली केल्याचे दिसून येत होते.