दुसरा डोस घेतल्यानंतर पहिल्याचा आला मेसेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:53+5:302021-06-09T04:41:53+5:30
पुरूषोत्तम करवा माजलगाव : मागील महिन्यात ४४ वयाखालील युवकांना लस देण्यात आली होती. या लसची कोठेच नोंद न ...
पुरूषोत्तम करवा
माजलगाव : मागील महिन्यात ४४ वयाखालील युवकांना लस देण्यात आली होती. या लसची कोठेच नोंद न झाल्याने व कसल्याच प्रकारचा मेसेज न आल्याने २०० पेक्षा जास्त युवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरी लस देण्यात आली तेव्हा कुठे पहिल्या डोसचा मेसेज युवकांना आला. यानंतरही युवकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसून येत होते.
शासनाने मे महिन्यात १८ ते ४४ वय गटातील युवकांना लस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या युवकांनी ऑनलाइन नोंदणी करत लस घेण्याबाबत मेसेजदेखील आला. त्यानंतर जवळपास २०० युवकांनी पहिला डोस घेतला; परंतु एक महिना उलटून गेला तरी त्यांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला नाही. या युवकांनी वारंवार ग्रामीण रुग्णालयात चकरा मारत आम्हाला पहिला डोस घेतल्याचा मेसेजच आला नसल्याचे सांगितले. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही आरोग्य विभागाकडून कोणीच काही बोलायला तयार नव्हते.
कोव्हॅक्सिन लसचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवस पूर्ण झाले. त्यानंतर हे युवक ग्रामीण रुग्णालयात जाऊन आम्हाला पहिला डोस घेऊन महिना झाला तरी आम्हाला डोस का दिला जात नाही, असा सवाल करीत दुसरा डोस देण्याची मागणी केली. त्यानंतर आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली व ६ मे रोजी ज्या युवकांनी लस घेतली होती त्यांची ऑनलाइन नोंदच न झाल्याने मोठा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर आरोग्य विभागाने सोमवारी या सर्व युवकांना बोलावून घेत त्यांची ऑनलाइन नोंद झाली नसल्याचे सांगत दुसरा डोस घेण्याचे सांगितले. त्यानंतर या युवकांना दुसरा डोस देण्यात आला. विशेष म्हणजे या नंतर या युवकांना पहिला डोस घेतल्याचा मेसेज आला.
दोन डोस घेऊनही पहिलाच मेसेज आल्याने आम्हा युवकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. काही कामासाठी लस घेतलेले प्रमाणपत्र लागल्यास कसे घ्यावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
-- पवन चांडक, दुसरी लस घेणारा युवक
या युवकांची ऑनलाइन नोंद न झाल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही सोमवारी या युवकांसाठी विशेष सत्र घेऊन त्यांना दुसरा डोस दिला आहे. आज पहिल्या डोसची नोंद करण्यात आली असून त्यांच्या दुसऱ्या डोसची नोंद एक महिन्यानंतर करण्यात येणार आहे. त्यावेळी या युवकांना पुन्हा लस घेण्याची गरज पडणार नाही.
-- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी
===Photopath===
070621\img_20210607_123709_14.jpg