बीडमध्ये आढळला 'डेल्टा'चा पहिला रूग्ण; राज्यातील रूग्णसंख्या ४५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 01:06 PM2021-08-09T13:06:54+5:302021-08-09T13:28:39+5:30
Corona Virus Delta Variant : विषाणूने आपली जनूकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूचा नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. यासंदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करावे.
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तोच आता कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल होऊन डेल्टा प्लस आला आहे. याचा एक रूग्णही बीडमध्ये नोंदवला गेला आहे. परंतू याबाबत अद्यापही बीड जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाला अधिकृत कसलीच माहिती प्राप्त झालेली नाही. असे असले तरी राज्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दिलेल्या माहितीत बीडमध्ये एक रूग्ण असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्यातील एकूण रूग्णसंख्या ४५ झाल्याचीही नोंद आहे.
महाराष्ट्र शासनाने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास गती मिळावी, यासाठी कौन्सिल ऑफ सांयटिफिक ॲंड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲंड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केलेला आहे. या नेटवर्कद्वारे प्रत्येक महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुने तपासले जातात. बीड जिल्ह्यातूनही अंबाजोगाईच्या स्वाराती प्रयोगशाळेतून आतापर्यंत ३०० नमुने पाठविण्यात आल्याची माहिती आहे. यात एक रूग्ण निष्पन्न झाल्याची नोंद राज्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाकडे झाली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषाणूने आपली जनूकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूचा नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. यासंदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बीड आरोग्य विभाग अनभिज्ञ
या रूग्णाबद्दल बीडच्या आरोग्य विभागाकडे अद्यापर्यंत कसलीच अधिकृत माहिती आलेली नाही. जिल्हा रूग्णालयाचे डॉ.बाबासाहेब ढाकणे यांनीही आपल्याकडे काहीच अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले. नियंत्रण कक्षातील साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनीही अद्याप अधिकृत ई-मेल आला नसल्याचे सांगितले. परंतू राज्याकडून एक मेसेज मिळाला असल्याचे ते म्हणाले. यावरून याबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यात ४५ रूग्णांची नोंद
या जनुकिय क्रमनिर्धारण तपासणीतू राज्यात ८० टक्केहून अधिक नुमण्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे सांगण्यात आले. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत ४५ डेल्टा प्लसचे रूग्ण आढळले आहेत. यात जळगाव १३, रत्नागिरी ११, मुंबई ६, ठाणे ५, पुणे ३ आणि पालघर, सिंधुदूर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमध्ये प्रत्येकी एका रूग्णाची नोंद आहे.
मी संबंधित विभाग प्रमुखांना बोललो आहे. आपल्याकडून नमुने गेलेले आहेत. परंतू त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त होत नाही. तो थेट आरोग्य मंत्रालयात पाठविला जातो. त्यामुळे याबाबत अधिकृत काहीच सांगता येत नाही.
- डॉ.शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता स्वाराती वैद्यकीय महा. अंबाजोगाई