पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनाची उत्साहात झाली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:57 PM2020-02-13T18:57:45+5:302020-02-13T18:59:49+5:30
झाडे लावा - झाडे जगवा, झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ या ब्रीदवाक्याचा जयघोष करीत उद्घाटन
बीड : झाडे जगली तर मराठवाड्याचा वाळवंट होण्यापासून आपण रोखू शकतो. त्यामुळे झाडे लावा - झाडे जगवा, झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ या ब्रीदवाक्याचा जयघोष करीत गुरुवारी ( दि. १३) जगातील पहिल्या वृक्ष संमेलनाचे थाटात उद्घाटन बीड शहराजवळील पालवणच्या ‘सह्याद्री देवराई’ येथे झाले.
यावेळी ज्यांच्या संकल्पनातून देवराई उभी राहिली ते सिने अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आ. संदीप क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, विभागीय वन अधिकारी मधुकर तेलंग, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, कृषी भूषण शिवराम घोडके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संमेलनात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. तसेच बीड व इतर शहरातून आलेल्या पर्यावरण प्रेमींनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अध्यक्षस्थानी आहे वडाचे झाड
दरम्यान, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड होते. यावेळी त्याचे मनोगत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. यात वडाचा जन्म, त्याची झालेली कत्तल, झाडे नसतील तर मानवावर होणारा परिणाम, भविष्यात पर्यावरणाचा धोका याविषयी परखड मत व्यक्त केले.
काष्ठशिल्पांचे प्रदर्शन ठरले लक्षवेधक
संमेलनात विविध प्रकारचे आकर्षक असे स्टॉल लावण्यात आले आहेत. यातील ‘काष्ठशिल्पाच्या प्रदर्शनाचा स्टॉल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हे काष्ठशिल्प नैसर्गिक असून, राज्यभरातील डोंगरदऱ्या व जंगलातून निवडण्यात आले आहे.
खरी श्रीमंती झाडासाठी काम करणे
खरी श्रीमंती झाडासाठी काम करणे आहे, झाडांची संख्या म्हणजे खरी संपत्ती आहे. प्रत्येकाने आपल्या गावात पाच-पाच झाडे लाऊन त्याची जोपासना करावी. - सयाजी शिंदे, अभिनेते