Video : 'फिरू नकू दादा, ही बिमारी पडली भारी'; बीडच्या संगीतकाराची 'रॅप'च्या माध्यमातून 'ब्रेक द चैन' ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:01 PM2021-05-03T13:01:14+5:302021-05-03T13:07:07+5:30
Rap song on Corona virus break the chain निष्काळजीपणा करणाऱ्यांना रस्त्यावर उभे राहून पोलीस ' दादा , तुम्ही घरात बसा ना' हा संदेश जनतेला देत आहेत.
- अनिल भंडारी
बीड : 'ब्रेक द चैन' ही नागरिकांना हाक देत बीडचे संगीतकार शैलेंद्र निसर्गंध आणि सहकाऱ्यांनी मराठमोळ्या रॅप साँगची निर्मिती केली आहे. या रॅपच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणा-या लोकांमुळे कोरोनाची साखळी लवकर तुटत नाही आणि यामुळे लॉकडाऊन वाढत आहे, हे कळूनही निष्काळजीपणा करणाऱ्यांना रस्त्यावर उभे राहून पोलीस ' दादा , तुम्ही घरात बसा ना' हा संदेश जनतेला देत आहेत. या आशयाचं हे रॅप अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
यावर्षीच्या लॉकडाउन काळामध्ये पोलिसांची संयमी भूमिका सर्वत्र पाहायला मिळाली. अनेकदा सांगूनही परिणाम होत नसेल तर त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागते. पण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांची सकारात्मक भूमिका आणि तळमळ आम्ही या रॅपद्वारे मांडली असून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यातून करण्यात आले आहे.
हे रॅप बीडचे संगीतकार शैलेंद्र निसर्गंध यांनी लिहिले असून गायले सुद्धा आहे. त्यांना गायिका सत्वशिला जाधव यांनी साथ दिली आहे. तसेच निळुभाऊ सावरगेकर, श्रद्धा कुर्हाडे, शुभम गवळी, नितिन धन्वे, अंकुश जाधव, अमित पवार, प्रल्हाद आव्हाड या बीडमधीलचा कलाकारांच्या यात भुमिका आहेत. तसेच व्हिडिओ निर्मिती अंकुश जाधव यांनी केली असून अक्की सोनवणे बप्पा जगताप, अमित पवार, हनूमान बोबडे, संभाजी जोगदंड, अमर शिनगारे या सर्व टिमचे सहकार्य लाभले आहे. पोलिसांची तळमळ मांडणाऱ्या या व्हिडिओची संकल्पना सांगताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक साबळे, बाळू गुंजाळ ,बाबू तांदळे यांनीही तत्परतेने आवश्यक ते सहकार्य केल्याचे शैलेंद्र निसर्गंध त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी येथील शैलेंद्र निसर्गंध अलीकडच्या काही वर्षात प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करीत त्यांनी ओठांवर रेंगाळणारी गीते निर्मिती करून संगीतबद्ध केली. बीड येथे झालेल्या वृक्ष संमेलनात झाडच विठ्ठल माझा झाडच रखुमाई ओसाड माळरानावर सह्याद्री देवराई, या गीताच्या माध्यमातून झाडाचा महत्त्व सांगणारे गाणे, मागील वर्षी लॉग डाऊन काळांमध्ये सामान्य घटकांचे झालेले हाल टिपताना देव माझा रुसला या व्हिडिओ निर्मितीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. समाजाला संदेश देणारा निसर्गंध यांचा दादा तुम्ही घरात बसा ना या व्हिडिओलाही सोशल मिडीयावर सर्वांच्या पसंतीला उतरले असून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.