खून प्रकरणी पाच आरोपींनी जन्मठेप
By Admin | Published: April 10, 2017 08:38 PM2017-04-10T20:38:01+5:302017-04-10T20:38:01+5:30
खून का बदला खून म्हणत शिवसंग्रामचे कार्यकर्ते व माजी सरपंच उध्दव सुरवसे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना बीड न्यायालयाने जन्मठेपेची
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 10 - खून का बदला खून म्हणत शिवसंग्रामचे कार्यकर्ते व माजी सरपंच उध्दव सुरवसे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना बीड न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवारी सुनावली. या प्रकरणातील उर्वरीत ११ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. कुंभारी (ता.बीड) येथील शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते व माजी सरपंच उद्धव सुरवसे यांचा चार वर्षांपूर्वी खून झाला होता.
उद्धव सुरवसे व चाकरवाडीचे माजी उपसरपंच विनोद कवडे हे दोघे २० मार्च २०१३ रोजी बीडहून दुचाकी (क्र. एमएच २३ व्ही-७०७७) वरु न गावी निघाले होते. मांजरसुंबा- नेकनूर रस्त्यावरील गवारी फाट्याजवळ त्यांचा पाठलाग करत पाठीमागून आलेल्या कार (क्र. एमएच १४ सीएक्स- १७२) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कवडे दुचाकी चालवित होते तर सुरवसे मागे बसले होते. अपघातानंतर दोघेही रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले. त्यानंतर कारमधील पाच जणांनी खाली उतरून उद्धव सुरवसे यांच्यावर खंजीर, तलवार, कत्ती अशा धारदार शस्त्राने वार केले. यावेळी कवडे दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाले होते. घटनास्थळापासून एक किमी अंतरावर सुरवसे यांचा पेट्रोलपंप आहे. कवडे यांनी तेथे फोन करुन जीप बोलावून घेतली. जिल्हा रुग्णालयात उद्धव सुरवसे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. उद्धव सुरवसे यांच्या हत्येमागे वेगवेगळे कांगोरे असल्याचे तपासात पुढे आले. ते कुंभारीचे माजी सरपंच होते. शिवाय नोव्हेंबर २०१२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पॅनल विजयी झाला होता. २० ते २५ वर्षांपासून ग्रामपंचायतीतील त्यांचे वर्चस्व होते. शिवाय १९९४ मध्ये महावीर सुरवसे यांचा खून झाला होता. त्यात मयत उद्धव सुरवसे, त्यांचे वडीलव भाऊ आरोपी होते; मात्र नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली होती. या खुनाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी त्यांच्या खुनाचा कट शिजविला. घटनेच्या आदल्या दिवशी गावात त्यांनी पार्टी केली होती. एकमेकांशी त्यांचे मोबाईलवरुन सतत बोलणे होत असे, असेही तपासात निष्पन्न झाले होते.