दोन चिमुकल्यांसह पाच जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:17+5:302021-05-17T04:32:17+5:30
शिरूर कासार : तालुक्यातील गोमळवाडा हे गाव कोरोनाच्या केंद्रस्थानी राहिले असले तरी वेळीच तपासणी व ...
शिरूर कासार : तालुक्यातील गोमळवाडा हे गाव कोरोनाच्या केंद्रस्थानी राहिले असले तरी वेळीच तपासणी व औषधींसह डाॅक्टरच्या सल्ल्याप्रमाणे घरीच विलगीकरणात राहून दोन चिमुकल्यांसह पाच सदस्यांनी कोरोनावर मात केली.
गोमळवाडा येथील शेतकरी हनुमान भागवत गवळी (२८), कमल भागवत गवळी (५०), प्रियंका हनुमान गवळी (२५), प्रेम हनुमान गवळी (५) व प्रतीक हनुमान गवळी (३) हे २४ एप्रिल रोजीच्या तपासणीत पाॅझिटिव्ह आले होते. त्यांना २५ रोजी सेंटरवर नेले असता घरीच विलगीकरणात राहण्याचे सांगितले. तेव्हापासून हे सर्व आपल्या राहत्या घरीच २ मे पर्यंत दिलेली औषधी घेत होते.
कोरोनाबाधित असल्याचे कळल्यापासून कुणाच्याही संपर्कात ते गेले नाहीत. तसेच योग्य आहार व वेळेवर औषधींसह काढा घेत होते. सर्वसामान्यपणे सांगितलेले व्यायाम करत राहिले आणि अखेर कोरोनावर मात केली. त्यानंतरही १२ मेपर्यंत क्वारंटाइन रहिले. आता ते सर्वसामान्यांप्रमाणे आपले काम करू लागले आहेत.
आमच्याबरोबर दोन लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याने जास्त चिंता होती, मात्र अशा परिस्थितीत आम्हाला आधार देत आदिनाथ गवळी यांनी धीर तर दिलाच, परंतु या काळात कमी-अधिक पाहिजे ती मदतदेखील केली, म्हणूनच आम्ही या अस्मानी संकटावर मात करू शकल्याची भावना हनुमान गवळी यांनी व्यक्त केली.
कोरोना संक्रमण काळात मी स्वत: सर्वांनाच माझ्या क्षमतेप्रमाणे मदत करतोय. त्यात दवाखान्यात पोहोच करणे, त्यांच्या घरी लक्ष ठेवणे, तपासणीपासून ते बेड मिळेपर्यंत व धीर देण्याचे काम करतो आहे, कुटुंब भावनेतून सर्वांनाच अशी मदत करीत असतो. यातून धीर देणे हाच उद्देश असल्याचे आदिनाथ गवळी म्हणाले.
फोटो ओळी : शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा येथील गवळी कुटुंबातील चिमुकल्यासह पाच जणांनी घरातच राहून कोरोनावर मात केली.
===Photopath===
160521\vijaykumar gadekar_img-20210516-wa0031_14.jpg