बीडमधील डॉक्टरचे ५७ लाख लुटणारे पाच बिहारी बाबू सायबर पोलिसांच्या जाळ्यात
By सोमनाथ खताळ | Published: July 6, 2024 06:01 PM2024-07-06T18:01:44+5:302024-07-06T18:02:23+5:30
फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवत बीडमधील डॉक्टरला लुटले
बीड : फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यात जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून बीडमधील केसोना ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉ. विठ्ठल सोनाजीराव क्षीरसागर यांची ५७ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ५ जानेवारी राजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात सायबर पोलिसांनी तपास करून बिहारमधील पाच भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
डॉ. विठ्ठल क्षीरसागर हे नोव्हेंबर महिन्यात सोशल मार्केटिंग साईट पहात होते. यातील एका साईटवर त्यांनी रिप्लाय दिला. त्यावरून त्यांना टेलीग्राम आयडी देऊन त्यावर बोलण्यास सांगितले. पाच ते सात दिवस समोरील व्यक्ती अर्पिता मोनिका (रा. बंगलोर) हिच्याशी मेसेजवर बोलणे झाले. यावेळी तिने आपण फॉरेक्स ट्रेडिंगसाठी इच्छुक आहात का? असा सवाल केला. यावर डॉ. क्षीरसागर यांनी होकार दिला. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यात सर्व वैयक्तिक माहिती भरली. १० नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी ४० हजार रूपये गुंतवणूक केली. त्याचे १५ नोव्हेंबरला ४५ हजार २०० रूपये नफा स्वरूपात मिळाले. त्यामुळे यांचा विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. ५७ लाख २० हजार रूपये गुंतवणूक झाल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांना गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला ३६ लाख रूपये टॅक्स बसला आहे. तो भरा, असे सांगितले. परंतु डॉ. क्षीरसागर यांनी हे पैसे मिळणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करा, असा आग्रह धरला.
त्यानंतर त्यांनी वारंवार मेसेज केले, परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी ५ जानेवारी २०२४ रोजी तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. हे भामटे बिहारमधील असल्याचे समजले. बिहारमध्ये जावून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, रामदास गिरी, विजय घोडके, प्रदीप वायभट, अजय जाधव यांच्यासह सायबर टीमने केली.