वीस दिवसात रोखले पाच बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:32 AM2021-05-23T04:32:49+5:302021-05-23T04:32:49+5:30
शिरुर कासार : तालुक्यात मे महिन्याच्या वीस दिवसांत एकूण पाच बालविवाह रोखण्यात तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, ...
शिरुर कासार : तालुक्यात मे महिन्याच्या वीस दिवसांत एकूण पाच बालविवाह रोखण्यात तालुका बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे, अशी माहिती तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी दिली आहे.
सध्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाभरात लॉकडाऊन व जमावबंदीसह अनेक निर्बंध लावलेले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील लोक हे आपल्या अल्पवयीन मुलींच्या इच्छेविरुद्ध कोणालाही माहिती न होऊ देता गुपचूप विवाह लावून देत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत.
शिरूर तालुक्यातील बडेवाडी येथील एका १७ वर्षीय मुलीचे व एका १५ वर्षीय मतिमंद मुलीचा विवाह हे त्यांच्या इच्छेविरुद्ध लावून देण्याची तयारी करण्यात आली होती, परंतु त्यातील एका मुलीने चाईल्ड लाईनच्या १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर व लेक लाडकी अभियानाकडे या बाबतीत माहिती दिल्याने ते रोखण्यात आले. त्याचबरोबर शिरापूर गात येथील १३ वर्षीय व कान्होबाचीवाडी येथील १२ वर्षीय दोन मुलींच्या होणाऱ्या बालविवाहाची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल संरक्षण समितीस व चाईल्ड लाईन यांना प्राप्त झाल्याने ते देखील बालविवाह हे १९ मे रोजी रोखले, कुटुंबातील सर्व सदस्य यांचे समुपदेशन करून व बालविवाहानंतरचे होणारे नुकसान आणि दुष्परिणाम याबाबत माहिती देऊन हे विवाह थांबवण्यात आले. संबंधित मुलींच्या पालकांनी देखील आम्ही मुलींचे १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करून देणार नाही, असे जबाब, हमीपत्र लिहून देत मुलींना पुढील शिक्षण देण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. सदरची कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम.हुंडेकर, तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी बाजीराव ढाकणे, स्वप्नील कोकाटे, चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक रामहरी जाधव, टीम मेंबर अश्विनी जगताप, तालुका बालसंरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण, बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाये, अंगणवाडी पर्यवेक्षिका करपे, ग्रामसेविका खेडकर, शिरापूरचे ग्रामसेवक, शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डाॅ.रामचंद्र पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक भागवत सानप, पो.कॉ. सोमनाथ जायभाये यांनी केली आहे. यावेळी बबनराव मोरे, अक्षय मोरे आदी उपस्थित होते.
....
मुलींना स्वत:च्या पायावर उभे करावे
पालकांनी आपल्या मुला-मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करून द्यावी. वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे विवाह करावेत. बालविवाह करून त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य व शैक्षणिक भविष्याचे नुकसान करु नये. अन्यथा मुला-मुलींनी चाईल्ड लाईनच्या १०९८ या मोफत क्रमांकावर तसेच बाल संरक्षण समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी केले आहे.