माजलगाव धरणाचे पाच दरवाजे उघडले , 6 हजार क्युसेकने विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 08:49 AM2020-09-17T08:49:08+5:302020-09-17T08:49:42+5:30
यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती.
माजलगाव : येथील माजलगाव धरण परिक्षेत्रात मागील चार दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. बुधवारी रात्री धरणाचा पाणीसाठा 98 टक्क्यांच्या वर गेला. रात्री 10 वाजता पूर्ण क्षमतेने भरत आल्याने धरणाचे पाच दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले असून धरणातुन 6 हजार क्युसेक ऐवढया वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. ऑगस्ट महिन्यात पंधरा-वीस दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती. मागील चार दिवसापासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. मंगळवारी सायंकाळी धरण 95 टक्के भरले होते. बुधवारी दुपारपर्यंत धरण भरेल असे वाटत असतांना पाण्याची आवक कमी झाली. मात्र बुधवारी रात्री 10 वाजेदरम्यान 98.72 मीटर पाण्याची पातळी होताच धरणातुन पाणी सोडण्यात आले. आता धरणाची पाणी पातळी 431.75 मीटर झाली होती .धरणात एकूण पाणीसाठा 450 दलघमी तर उपयुक्त पाणी साठा 308 दलघमी झाला असल्याची माहिती धरणाचे अभियंताबी.आर. शेख यांनी दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धरणास भेट
अधीक्षक अभियंता निकुडे एस. जे. कडा बीड, कार्यकारी अभियंता सल्गरकर ए. आर, माजलगाव पाटबंधारे विभाग परळी सी. एम. झेंड उप विभागीय अधिकारी यांनी भेट देऊन धरणाची पाहणी केली व पाणी सोडण्याबाबत कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या.