अन्नत्याग आंदोलनात पाचशे शेतकऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:50+5:302021-03-20T04:32:50+5:30
अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ...
अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० किसान पुत्रांनी या अन्नत्याग आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण जि. यवतमाळ येथील बालासाहेब करपे आणि मालती करपे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लेकरांसह सामूहिक आत्महत्या केली. शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या अशी नोंद या आत्महत्येची शासन दरबारी झाली. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या जाचक कायद्यामुळे आजपर्यंतच्या सर्व शेतकरी आत्महत्या होत आहेत, असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे. जोपर्यंत शेतकरी विरोधातील जाचक कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत अशा आत्महत्या सुरुच राहतील, त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी किसानपुत्र आंदोलन गेली पाच वर्षांपासून सातत्याने करीत आहे. याच मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाचा उपक्रम राबवला जात आहे. अंबाजोगाई शहरात हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविला जात असून यावर्षी या आंदोलनास अंबाजोगाई, दैठणा, नांदेड, पूस, चनई, गडचिरोली, केज, पाटोदा, घाटनांदूर, माजलगाव तसेच अन्य गावांमधून प्रतिसाद मिळाला.
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
महाराष्ट्रात आणि देशात आजपर्यंत झालेल्या सर्व शेतकरी आत्महत्या या शेतकरी विरोधी जाचक कायद्यामुळेच झाल्या असून हे जाचक कायदे त्वरित रद्द करा या मागणीचे एक निवेदन येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांना देण्यात आले. यावेळी सुदर्शन रापतवार, कालिदास आपेट, ॲड. संतोष पवार, ॲड. संतोष लोमटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, पुंडलिक बापू पवार, मनोहर कदम, डॉ. डी. एच. थोरात, जगदीश जाजू, गणेश चौधरी, लखन होके, विनोदकुमार बुरांडे, संजय आपेट, राजेंद्र रापतवार, आप्पाराव पांढरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
190321\avinash mudegaonkar_img-20210319-wa0059_14.jpg
===Caption===
अंबाजोगाईत १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भाने किसानपुत्रांनी अन्नत्याग आंदोलन केले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करणारे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांना देण्यात आले.