महाजन वाडीत पाचशे किलो चंदन पकडले; दहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By अनिल लगड | Published: July 24, 2022 11:08 AM2022-07-24T11:08:46+5:302022-07-24T11:09:10+5:30
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई
केज - बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता कारवाई करत शेतातील चंदनाची झाडे तोडून त्यातून काढून ठेवलेला पाचशे किलो चंदनाचा गाभा व बोलोरो पिकअप सह २०लाख ७२ हजार ७०० रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील अशोक रामहरी घरत याने त्याच्या त्याच्या राहत्या घरात साथीदाराच्या मदतीने शेतातील चंदनाची झाडे चोरून तोडून आणत त्यातील झाडाची खोडे तपासून त्यातील चंदनाचा गाभा चोरटी विक्री करण्यासाठी आणून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत २३ जुलै रोजी मिळाल्याने त्यांनी या बाबतची माहिती पोलीस अधीक्षक बबेड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी महाजनवाडी येथे जाऊन शनिवारी सायंकाळी सहा वाजता अशोक घरत याच्या घरी छापा मारला असता त्याच्या घराची झडती घेतली असता घरात ४९९ किलो चंदनाची तासलेला गाभा ,लाकडे, वजन काटा ,वाकस , व कुर्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण २० लाख ७२ हजार ७०० रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दहा आरोपी विरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.