बीड जिल्ह्यात विविध अपघातांमध्ये ४ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:22 AM2020-01-09T00:22:15+5:302020-01-09T00:22:48+5:30
जिल्ह्यात बुधवारी बीड तालुक्यातील च-हाटा फाटा येथे दोघांचा तर धारूर तालुक्यातील कारी येथे एकाचा अपघाती मृत्यू झाला.
बीड : जिल्ह्यात बुधवारी बीड तालुक्यातील च-हाटा फाटा येथे दोघांचा तर धारूर तालुक्यातील कारी येथे एकाचा अपघातीमृत्यू झाला. बीडजवळील चºहाटा फाट्याजवळ भरधाव बसने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले तर धारुर तालुक्यात पादचारी तरुणास कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच बीड तालुक्यातील मैंदा येथे ट्रॅक्टरच्या टायरखाली सापडून चालक जागीच ठार झाला.
आष्टी आगाराच्या बीडहून बारामतीकडे जाणाऱ्या बसने (एमएच४० एन-९१७६) बीड शहरानजीक चºहाटा फाट्याजवळ बुधवारी रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच ४३ टी४५४२) ला समोरासमोर धडक दिली. या अपघातात पुणे येथून परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे जाणाºया राजेश्वर वसंतराव घुमरे (२९ ) व कुलदीप सदाशिव ठोके (२८, दोघे रा.गाढे पिंपळगाव, ता.परळी) हे दोघे जागीच ठार झाले आहेत. ते दोघेही पुण्यात एका खासगी कंपनीत काम करीत होते.
राजेश्वरच्या चुलत्याचे निधन झाल्याने राख सावडण्याच्या कार्यासाठी ते गाढेपिंपळगाव येथे जात होते. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक कुलदीपच्या डोक्यावरील हेल्मेटचे तुकडे झाले. दुचाकीही चक्काचूर झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी ठाणेप्रमुख सपोनि सुजित बडे , सहायक फौजदार दिनकर एकाळ, पोना भागवत शेलार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत मयतांची ओळख पटवून नातेवाईकांना कळविले.
दरम्यान मयत राजेश्वर याचे वडील-आई आणि भाऊ कर्नाटक राज्यात ऊस तोडणीच्या कामासाठी गेलेले आहेत. त्यांना देखील अपघाताची माहिती देण्यात आली आहे.
टायरखाली सापडून ट्रॅक्टर चालक ठार
बीड तालुक्यातील मैंदा येथे ट्रॅक्टर (एमएच ४४ डी ४०६२) च्या चाकाखाली मोठा दगड आल्याने चालक अमोल उजगरे (वय २५) हा तोल गेल्याने खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरचे मोठे चाक अंगावरुन गेल्याने अमोल जागीच ठार झाला. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय साईप्रसाद पवार, सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच अमोल याचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.