भर दुपारी बँकेसमोरून पाच लाखांची बॅग पळवली, माजलगावातील मुख्य रस्त्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:07 PM2021-12-08T19:07:40+5:302021-12-08T19:18:54+5:30
crime in Beed : शहरात मागील आठ दिवसांपासून चोरीच्या घटनेत चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे.
माजलगाव ( बीड ) : शहरातील मुख्य रस्त्यावरील बँकेसमोरून ५ लाख रुपये असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, शहरात मागील आठ दिवसांपासून चोरीच्या घटनेत चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे.
माजलगाव शहरातील नवीन बस स्थानकासमोर पूर्णवादी नागरिक सहकारी बँके आहे. आज दुपारी शहरातील व्यापारी सागर संतोष दुगड यांचा मुनीम संतोष दिग्रस्कर यांनी बँकेतून ५ लाख रुपये काढून बॅगमध्ये ठेवले. हे पैसे एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जाण्यासाठी दिग्रस्कर दुचाकीवरून निघाले. ५ लाख रुपये असलेली बॅग त्यांनी दुचाकीला अडकवली. ऐवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दिग्रस्कर यांच्या दुचाकीची बॅग ओढून घेतली. काही कळायच्या आत दुचाकीवरील दोघे बॅगेसह तेथून भरधाव वेगात निघून गेले. शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या भागात मागील ८ दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली. आज तर वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर चोरट्यांनी भर दुपारी चोरीची बॅग पळविल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.