पाच लाख रूपयों लाच प्रकरण; बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 04:12 PM2019-02-05T16:12:46+5:302019-02-05T16:13:38+5:30
आणखी चार दिवस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
बीड : पाच लाख रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी बीडचे अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे व अव्वल कारकुन महादेव महाकुडे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. न्यायालयाने अगोदर त्यांना तीन दिवस तर आता आणखी त्यात वाढ करून ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यांचा आणखी चार दिवस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
बीडच्या शासकीय धान्य गोदामासंदर्भातील चौकशीत दोषी असलेल्या गोडावून किपरला मदत करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे आणि अव्वल कारकुन महादेव महाकुडे यांनी पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. हीच लाच स्विकारताना २ फेब्रुवारीला सकाळी बीड एसीबीने सापळा रचून कांबळे व महाकुडे यांना कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर ३ फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी संपल्यानंतर मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता आणखी चार दिवसांची वाढ करून ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पोनि गजानन वाघ, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, अमोल बागलाने, प्रदीप वीर, भरत गारदे, सय्यद नदीम या टिमने केली होती.