निवृत्त कृषी सहसंचालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:31+5:302021-05-20T04:36:31+5:30
बीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील १८ लाख ३२ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी सेवानिवृत्त माजी जिल्हा ...
बीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील १८ लाख ३२ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी सेवानिवृत्त माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यासह ५ जणांविरूद्ध परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सेवानिवृत्त कृषी सहसंचालक औरंगाबाद रमेश सोपानराव भताने, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी भिमराव बाजीराव बांगर, कृषी सहाय्यक शंकर सखाराम गव्हाणे, दिपक जगदेवराव पवार, सुनिल रामराव जायभाये, कमल नागनाथ लिंबकर या सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. शासकीय सेवेत असताना त्यांनी बनावट व खोटे दस्तऐवजाचा वापर करून १८ लाख ३२ हजार ३६६ रुपयांचा अपहार केला, अशी फिर्याद तालुका कृषी अधिकारी अशोक अंबादास सोनवणे यांनी परळी ठाण्यात दिली. त्यानुसार १८ मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा व अपहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्याबाबत काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी लोकायुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार लोकायुक्तांनी शासनाला व शासनाने पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने पुन्हा मुंडे यांनी तक्रार केल्यानंतर १८ मे रोजी या आरोपींवर अपहारप्रकरणी परळी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि जी.बी. पालवे हे करत आहेत.