हिवरा पहाडी शाळेत ७ शिक्षक गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:57 AM2019-12-18T00:57:04+5:302019-12-18T00:57:20+5:30
जरुड केंद्रांतर्गत हिवरापहाडी जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी १३ पैकी ७ शिक्षक गैरहजर आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील जरुड केंद्रांतर्गत हिवरापहाडी जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी १३ पैकी ७ शिक्षक गैरहजर आढळून आले. शिक्षणाधिकारी सुदाम राठोड यांनी अचानक केलेल्या पाहणीत याशिवाय केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांचा गैरकारभारही चव्हाट्यावर आला. या प्रकरणी कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी राठोड, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, विस्तार अधिकारी तुकाराम पवार यांनी जरुड केंद्रांतर्गत हिवरापहाडी येथील जि. प. शाळेला भेट दिली. त्यावेळी सात शिक्षक गैरहजर आढळून आले.
याबाबत विचारणा केली असता केंद्रीय मुख्याध्यापकाने आयकर विवरण पत्र भरण्यासाठी प्रत्येक शाळेतील ५० टक्के लोकांनी केंद्रीय प्राथमिक शाळा जरुड येथे उपस्थित राहण्याबाबत (सोशल मीडियावरील ग्रुपवर) कळविल्याचे सांगितले. मात्र केंद्रीय मुख्याध्यापकाला शिक्षकांच्या खाजगी कामाबाबत अशा सूचना देता येत नाहीत. तसेच केंद्रीय मुख्याध्यापक भगवान पवार यांची नियुक्ती दुरुगडे जि. प. शाळेवर आहे. वरिष्ठांचे आदेश नसताना येथे या पदावर चार वर्षांपासून कार्यरत असल्याचे देखील यावेळी चौकशीत उघड झाले.
शिक्षकच पाहतो कारभार
केंद्रपमुख, केंद्रीय मुख्याध्यापक कसलेही काम पाहत असल्याचे दिसून आले. तर शिवणीपासून जवळच असलेल्या भिल्लवस्ती येथील शाळेचा एक शिक्षक दोघांची कामे पाहत असल्याचे पुढे आले. बैठक, टपाल, सूचना, संदेश देण्याचे काम खरात नामक शिक्षक करत असल्याचे या पथकाच्या तपासणीत आढळले.
केंद्रप्रमुख नावालाच
जरुड केंद्रांतर्गत केंद्रप्रमुख म्हणून सिद्दीकी सादेक काम पाहतात. या केंद्रांतर्गत ३० शाळा येतात. मात्र जॉबचार्टनुसार यापैकी एकाही शाळेला जूनपासून केंद्र प्रमुखांनी भेट दिली नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे घटक शाळेवर नियुक्ती असताना जरुड येथे काम कोणाच्या आदेशाने ते करत होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्वच्छतेचे तीन तेरा
हिवरा पहाडी शाळा परिसरात अस्वच्छता दिसून आली. तसेच पटसंख्येनुसार मुलांची उपस्थिती ५० टक्के होती. तर सात शिक्षक गैरहजर होते, असे या पाहणीत आढळले.