पथकाकडून पावणेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:21 AM2019-05-19T00:21:08+5:302019-05-19T00:21:57+5:30
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक अवघ्या चार महिन्यात अवैध धंद्यावाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. विविध गुन्ह्यांत ७९८ आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४ कोटी ६३ लाख ५७ हजार ३२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक अवघ्या चार महिन्यात अवैध धंद्यावाल्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. विविध गुन्ह्यांत ७९८ आरोपींना ताब्यात घेत तब्बल ४ कोटी ६३ लाख ५७ हजार ३२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आतापर्यंतच्या पथकांमध्ये ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जानेवारीत नव्याने दुसरे पथक नियूक्त केले. या पथकात सर्व तरूण अधिकारी, कर्मचारी नियूक्त केले. पथक प्रमुख म्हणून रामकृष्ण सागडे यांच्यावर जबाबदारी सोपविली. पांडुरंग देवकते, रेवणनाथ दुधाने, गणेश नवले, अंकुश वरपे, जयराम उबे, हनुमंत राठोड हे कर्मचारी त्यांच्या सोबतीला दिले.
नियुक्ती होताच पहिल्याच दिवशी पथकाने गेवराई तालुक्यात गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना दणका दिला. जेसीबी, हायवासह अनेक वाहने ताब्यात घेतले. वाळू माफियांसाठी हा पहिला दणका ठरला. त्यानंतर जुगार, मटका, दारू, आयपीएल, अवैध कत्तलखाना, गोमांस, कत्तलखान्यात जाणारे जनावरे सोडणे, रॉकेल, गॅस, अवैध फटाका स्टॉल, गुटखा अड्डयांवर धाडी टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोटींचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक अचानक धाडी टाकत असल्याने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
तडीपार आरोपी, आर्म अॅक्टच्या कारवाया
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतरही जिल्ह्यात वावरणाºया ७ आरोपींना बेड्या ठोकल्या. ७ तलवार व १ गावठी कट्टा पकडून ८ जणांवर आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल केले. तसेच नियमित बंदोबस्तही केला. चार महिन्यात या पथकाची एकही तक्रार नसल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.