आष्टीत वनरक्षक तर बीडमध्ये क्षेत्र सहायक लाच घेताना चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:12 AM2018-12-19T00:12:22+5:302018-12-19T00:12:52+5:30
बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक आणि आष्टी वन परीक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसीबीने एकाच दिवसांत दोन कारवाया करून खळबळ उडवून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक आणि आष्टी वन परीक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसीबीने एकाच दिवसांत दोन कारवाया करून खळबळ उडवून दिली.
तुती लागवडीचे (रेशीम शेती) व किटक पालनासाठी उभारलेल्या शेडचे अनुदानासाठी दाखल केलेल्या दोन फाईल मंजूर करण्यासाठी बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक बाळासाहेब नामदेव सूर्यवंशी यांनी आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर याबाबत एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली. १३ डिसेंबर रोजी याबाबत सापळा लावला. मात्र त्यांनी त्यावेळी केवळ लाचेची मागणी केली, स्वीकारली नाही. नंतर मंगळवारी पुन्हा सापळा लावला. मात्र लाचेबाबत सूर्यवंशी यांना कुणकुण लागल्याने त्यांनी लाच घेतली नाही. मात्र लाच मागितली म्हणून सूर्यवंशी यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी कारवाई आष्टी येथील बसस्थानक परिसरात झाली. लाकुड वाहतुकीचे ट्रॅक्टर चालु देण्यासाठी वनरक्षक त्रिंबक सीताराम पवळ यांनी १५०० रूपयांची लाच मागितली होती. १४ डिसेंबरला लाच मागितल्याची खात्री पटली. मंगळवारी आष्टी बसस्थानकाच्या समोर लाच घेताना पवळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस.आर.जिरगे यांच्य मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोनि गजानन वाघ व त्यांच्या चमूने केली.