बीड जि.प.त महाविकास आघाडीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:04 AM2020-01-25T00:04:39+5:302020-01-25T00:06:04+5:30
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. महिला बालकल्याण सभापतीपदी गेवराई तालुक्यातील पाचेगाव जि.प.गटाच्या शिवसेनेच्या यशोदा बाबुराव जाधव यांची तर समाजकल्याण सभापतीपदी तालखेड जि.प.गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कल्याण आबूज यांची बिनविरोध निवड झाली.
बीड : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. महिला बालकल्याण सभापतीपदी गेवराई तालुक्यातील पाचेगाव जि.प.गटाच्या शिवसेनेच्या यशोदा बाबुराव जाधव यांची तर समाजकल्याण सभापतीपदी तालखेड जि.प.गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कल्याण आबूज यांची बिनविरोध निवड झाली. विषय समिती सभापतीपदी धारुर तालुक्यातील तेलगाव जि.प.गटाचे सदस्य जयसिंह सोळंके तर गेवराई तालुक्यातील रेवकी गटाच्या सदस्या सविता बाळासाहेब मस्के यांची बिनविरोध निवड झाली.
जिल्हा परिषदेत ४ जानेवारी रोजी अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीने ३२ विरुद्ध २१ मतांनी विजय संपादन केला होता. तर शुक्रवारी समाजकल्याण, व महिला बालकल्याण या दोन समित्यांच्या सभापतींची तसेच दोन विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली.
जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी १० ते २ या वेळेत सदस्यांचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. समाजकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून कल्याण साहेबराव आबूज यांचे २ अर्ज तर भाजपकडून भागवत बळीराम नेटके यांचा एक अर्ज दाखल झाला होता. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी महाविकास आघाडीच्या यशोदा बाबुराव जाधव, स्वतंत्र शोभा उद्धव दरेकर व भाजपकडून सविता रामदास बडे यांचे अर्ज दाखल झाले. याशिवाय विषय समिती सभापती निवडीसाठी शिवसेनेचे युध्दाजित बदामराव पंडीत यांचे दोन, महाविकास आघाडीचे जयसिंह धैर्यशील सोळंके यांचे दोन, भाजपकडून जयश्री बालासाहेब शेप यांचे दोन अर्ज दाखल होते. तसेच भाजपकडून सदस्य अविनाश अशोक मोरे, अशोक चांदमल लोढा यांचे प्रत्येकी १ असे एकूण ९ अर्ज दाखल झाले होते.
पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मच्छिंद्र सुकटे व सहाय्यक अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी सर्व अर्जाची छाननी केली. सर्व अर्ज वैध ठरल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान दुपारी पावणेतीन ते तीन या वेळेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. यावेळेत समाजकल्याण सभापती पदाच्या निवडीतून भागवत नेटके यांनी तर महिला व बालकल्याण सभापती निवडणुकीतून सविता बडे व शोभा दरेकर या सदस्यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे समाजकल्याण सभापतीपदी कल्याण आबुज तसेच महिला व बालकल्याण सभापतीपदी यशोदा जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी सुकटे यांनी घोषीत केले.
निवड प्रक्रिया पार पडेपर्यंत शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवड प्रक्रि या शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
धनंजय मुंडेबीडमध्ये ठाण मांडून
सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी बीडमध्ये होते. गुरुवारपासून सुरु असलेला पेच सोडवित महाविकास आघाडीचे ऐक्य राखण्यात ते यशस्वी झाले. दरम्यान या निवडीनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व सदस्यांचे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानत जिल्हा परिषदेमध्ये पारदर्शक कारभार करू अशी ग्वाही दिली. राज्यात आणि जिल्हा परिषदेत एकाच आघाडीचे सरकार आल्याने विकासाला गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .
यावेळी आ. प्रकाश दादा सोळंके , आ.बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडीत, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, सुनील धांडे, विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौंड, जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिरसाट , उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.