महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:13+5:302021-05-03T04:28:13+5:30
बीड : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ साधेपणाने पार ...
बीड : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ साधेपणाने पार पडला. यावेळी मुंडे यांनी अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना वंदन केले तसेच जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनतर बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा व व्यापक लसीकरण मोहिमेच्या धोरणासंदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी बैठकीस आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी मनीषा मिसकर, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांसह सर्व विभागातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात व अन्य रुग्णालयात नातेवाईकांची वाढती गर्दी हीसुद्धा वाढत्या संसर्गास खतपाणी घालणारी ठरत आहे, यासाठी अतिआवश्यक असलेल्या रुग्णांच्या फक्त एका नातेवाईकास तेही पास देऊनच भेटण्याची मुभा द्यावी, आवश्यक असल्यास आणखी पोलीस सुरक्षा वाढावी, तसेच रेमडेसिविर इंजेक्शन वाटप, ऑक्सिजनचा अपव्यय टाळून योग्य गरजूंना पुरवठा होणे यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी विशेष लक्ष देऊन या बाबी सुरळीत कराव्यात असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यात आणि विशेष करून बीड शहरात बाहेरून शटर बंद व आतून मात्र सगळं सुरू, अशी परिस्थिती आहे, असा लॉकडाऊन काही कामाचा नाही, पोलीस अधीक्षकांनी स्वतः यात लक्ष घालून लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी. लॉकडाऊनच्या काळात साखळी तोडायची असेल तर निर्बंधांचे काटेकोर पालन झालेच पाहीजे; असे सक्तीचे निर्देश ना. धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना दिले आहेत.
===Photopath===
020521\02_2_bed_41_02052021_14.jpeg
===Caption===
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहन करताना पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर.राजा. आमदार संदीप क्षीरसागर आदी.