Video: हाती पताका, मुखी हरीनाम; मुस्लीम भाविकांकडून वारकऱ्यांची सेवा, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 08:27 PM2023-06-19T20:27:29+5:302023-06-19T20:34:21+5:30
गावातील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांचे स्वागत, नाष्टापाणी व निरोप देण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत आदर्श घालून दिला.
- नितीन कांबळे
कडा -आष्टी तालुक्यातील धामणगावात नेहमी विविधतेत एकता अनुभवयाला मिळते. गावामध्ये विविध जाती-धर्माची लोक मोठ्या गुण्यागोंविदाने राहतात. पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील खामगाव येथील दिंडीतील वारकऱ्यांना चहा-नाष्ट्याची व्यवस्था मुस्लीम बांधवांनी केली. तसेच दिंडीसोबत काहीवेळ सोबत जात 'ग्यानबा...तुकाराम' म्हणत ठेका धरला. यातून हिंदु-मुस्लिम ऐक्य किती घट्ट आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला.
आषाढी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची सर्वांना ओढ लागलेली आहे. अनेक वारकरी दिंडीत सामील होऊन पंढरीला जातात. तर काही मंडळी वारकऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानतात. यावर्षी नेवासा तालुक्यातील खामगांव येथील वारकरी पांडुरंग भेटीसाठी दिंडी घेऊन प्रथमच निघाले. दरम्यान, धामणगांव येथील मुस्लिम बांधवांनी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत, नाष्टापाणी व निरोप देण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत आदर्श घालून दिला. दिंडीला निरोप देतानाचे दृष्य तर अत्यंत मनमोहक होते. डोक्यावर टोपी, गळ्यात पंचा तर हातात भगवी पताका घेऊन मुखी हरिनाम घेत मुस्लिम बांधवांनी जागोजागी फुगडी खेळली. विठूरायाच्या जयघोषात नाचण्यात तल्लीन झाले.
बीड: धामणगाव येथील मुस्लीम भाविकांकडून वारकऱ्यांची सेवा, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग. pic.twitter.com/ddVKQVn5YK
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) June 19, 2023
माणुसकीचा धर्म सर्वात मोठा
जातीयतेपेक्षा माणूसकी हा धर्म मोठा आहे. ती शिकवण आम्ही आजवर जोपासल. येथून पुढेही ही परंपरा अखंड राहील, असे धामणगावचे माजी सरपंच तथा आष्टी दुध संघाचे चेअरमन संजय गाढवे यांनी सांगितले.
प्रत्येकात पांडुरंग- अल्लाह
आम्ही स्वतःला धन्य समजतो की, आम्हाला ही सेवा देण्याचे भाग्य लाभले. देशात- राज्यात काय सुरु आहे, याकडे आम्ही कधीच पाहत नाही. प्रत्येकाच्या अंतरात्म्यात पांडुरंग-अल्लाह असल्याच्या भावना धामणगावचे उपसरपंच डॉ. अकील सय्यद यांनी व्यक्त केल्या