मांजरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:08+5:302021-09-25T04:36:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : गुरुवारी (दि.२३) झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. परिणामी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : गुरुवारी (दि.२३) झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. परिणामी मांजरा धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.
मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बुधवारी (दि.२२) सकाळी सहा दरवाजे सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. रात्री पाणीपातळी कमी झाल्याने चार दरवाजे बंद करून फक्त दोन दरवाजे चालू ठेवण्यात आले होते. गुरुवारी रात्री ८ वाजता हे दोन दरवाजे देखील बंद करण्याचे नियोजन होते. मात्र, गुरुवारी दुपारपासूनच मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी तर पावसाने रौद्ररूप धारण केले. अतिवृष्टीमुळे धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे रात्री सहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. परंतु, पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ होत असल्याने अखेर शुक्रवारी सकाळी ७ वाजता धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीला पूर येऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून दरवाज्यावरून पाणी वहात असल्याने लवकरच सर्व दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.
...
शेतीचे अतोनात नुकसान
दरम्यान, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतीचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी असताना सध्या धरणात २२६.५ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शेकडो एकर शेतात घुसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
...
बंधाऱ्याचे दरवाजे तुटले, पूल पाण्याखाली
दरम्यान, मांजरा धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रचंड वेगाने अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर-कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे दरवाजे तुटल्याही माहिती सूत्रांनी दिली. तर, आवाड शिरपुरासहीत इतर अनेक लहान पूल पाण्याखाली गेले आहेत.
...
सतर्कता बाळगण्याच्या सूचना
मांजरा धरणातून पाणी नदीपात्रात सोडले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.
240921\1236-img-20210924-wa0019.jpg
मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने नदीला पूर आला आहे.