बीड जिल्ह्यात कामांची झाडाझडती; बीडीओंची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:28 AM2018-01-12T00:28:05+5:302018-01-12T00:31:03+5:30

बीड जिल्ह्यात बुधवारपासून आलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी गुरुवारी दिवसभर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील कामांसह शासकीय योजनेतील विविध कामांची पाहणी केली. या कामांची झाडाझडती घेताना अनेक प्रश्नांवर निरुत्तर झालेल्या गटविकास अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.

Flooding work in Beed district; Bidi rubbish | बीड जिल्ह्यात कामांची झाडाझडती; बीडीओंची खरडपट्टी

बीड जिल्ह्यात कामांची झाडाझडती; बीडीओंची खरडपट्टी

googlenewsNext
ठळक मुद्देपंचायत राज समितीचा दौरा

बीड : जिल्ह्यात बुधवारपासून आलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी गुरुवारी दिवसभर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील कामांसह शासकीय योजनेतील विविध कामांची पाहणी केली. या कामांची झाडाझडती घेताना अनेक प्रश्नांवर निरुत्तर झालेल्या गटविकास अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.

आ. सुधीर पारवे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या पीआरसी सदस्यांनी विविध ठिकाणी शाळा व योजनांची तपासणी केली. भ्रष्टाचाराच्या तक्रारी असलेल्या रस्ते व कामांची पाहणी केली तर काही मुद्यांना बगल देण्यात आली. विकास कामांसाठी काही योजनांमध्ये अपुरा निधी तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचे तसेच विविध कामांमध्ये अनियमितता असल्याचे दिसून आल्याने समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.


वडवणी आरोग्य केंद्राचा आढावा
वडवणी : पंचायतराज समितीचे गटप्रमुख आ.आर.टी.देशमुख, आ.डॉ.देवराव होळी, उप.मु. का. अधिकारी एम.एस. वासनिकसह अधिकारी पदाधिकारी पंचायत समितीमध्ये आढावा घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता दाखल झाले. समितीतील ३ पैकी केवळ २ आमदार उपस्थित होते. विविध विभागांच्या मुद्यांच्या अनुषंगाने झाडाझडती घेतली. पंचायत राज समितीने आधीच दिलेल्या या मु्द्यांवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही.आर. नागरगोजे यांनी अनुपालन अहवालही सादर केले. आढावा होताच समितीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचा आढावा घेतला. बसस्थानक परिसरातील अंगणवाडी शाळा याठिकाणी आहाराबाबत सखोल चौकशी करून गटसाधन केंद्रात धान्याचे मोजमाप केले. यावेळी कार्यालय प्रमुखाची उत्तरे देताना भंबेरी उडाली. या समितीबरोबर सर्व विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांसह पदाधिकारी उपस्थित होते.


शिरूरमध्ये समितीची अधिका-यांना धडकी
शिरूर कासार येथील शासकीय निवासी शाळेमध्ये झालेल्या बैठकीत तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी अपुरा आणि अर्धवट निधी आला असल्याची प्रतिक्रि या पंचायत राज समिती प्रमुख आ. भारत गोगावणे यांनी दिली. यावेळी समिती सदस्य आ. सुधाकर कोहले, आ. रणधीर सावरकर हे उपस्थित होते. पंचायतराज समितीच्या दौºयामुळे अधिकाºयांना चांगलीच धडकी भरली. शासकीय निवासी शाळेत तालुक्यातील सर्व शासकीय विभागप्रमुखांचा आढावा घेण्यात आला. आ. गोगावणे म्हणाले, आढावा बैठकीचा अहवाल आम्ही मंत्रालयात सादर करणार असून तालुक्याच्या विकास कामांना अपुरा निधी मिळाला असल्यामुळेच बहुतांश कामे प्रलंबित आहेत. शिवाय झालेल्या कामांची यंत्रणेमार्फत चौकशी करून खात्री करणार असल्याचे सांगत एक-दोन गावांमध्ये शासन निधीचा अपहार झाला असण्याची शक्यता देखील व्यक्त केली. शिरूर तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील गोगावणे म्हणाले.

केजमध्ये एकाच गावाला भेट
केज : मोठा गाजावाजा करून केज तालुक्यात आलेल्या पंचायत राज समितीने तालुक्यातील केवळ मस्साजोग या एकाच गावातील जि.प.माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि पशुधन दवाखान्याला भेट दिली. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेत धारूरकडे काढता पाय घेतला. समितीत आ.दिलीप सोपल, आ.विक्रम काळे, आ.दत्तात्रय सावंत यांचा समावेश होता. नंदकिशोर मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, पंचायत समितीचे सभापती संदीप पाटील यांनी समितीचे स्वागत केले. संजय बुरकूल, शशिकांत साखरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.भाकरे हे सुद्धा समितीसोबत होते. गटविकास अधिकारी अंकुश गुंजकर यांना शासनाकडून विविध योजनेखाली आलेल्या निधी वापराबाबत विचारणा करून त्यातील त्रुटींबाबत योग्य ती समज देण्यात आली.

अपूर्ण माहितीला वैतागून आटोपली बैठक
धारूर : पंचायत समितीमध्ये आलेल्या तीन सदस्यीय पंचायतराज समिती गटासमोर प्रभारी अधीकारी वारंवार सांगुनही अपूरी माहीती देत असल्यामुळे अवघ्या दीड तासात बैठक आटोपली. तालुक्यात कुठेही भेट न देता समिती परतील. महत्त्वाच्या खात्याच्या अधिका-यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली. समितीत प्रमुख आ.दिलीप सोपल, आ.विक्रम काळे, आ.दत्तात्रय सांवत यांचा समावेश होता. विविध विभागांचा आढावा घेत असताना शिक्षण विभाग, बालविकास प्रकल्प कार्यालय, लेखा विभाग यांचे प्रभारी अधीकारी वारंवार विचारूनही व्यवस्थित माहिती देत नसल्यामुळे समितीचे सदस्य वैतागून गेले होते. तर पं.स. कृषी विभागात योजनेवरील खर्चापेक्षा कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च जास्त असल्याचे समितीला दिसले. तसेच पाणीपुरवठा सारख्या महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी बैठकीला गैरहजर होते. याला वैतागून समिती अवघ्या दीड तासामध्येच कुठेही भेट न देता परतली.

आष्टीमध्ये दोन रस्ता कामांची केली पाहणी
आष्टी : येथे आलेल्या पंचायत राज समितीत आ. सतीश चव्हाण, आ. वीरेंद्र जगताप, आ. राहुल मोटे व आ. बाळाराम पाटील यांचा समावेश होता. भ्रष्टाचाराच्या तक्रारी असलेल्या दोन रस्ता कामांची त्यांनी पाहणी केली. तसेच चिंचपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही अचानक भेट देऊन विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला. दुपारी चारच्या सुमारास समितीचे पाटोद्याहून आष्टी शहरात आगमन झाले. कासारी-मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात अधिका-यांची बैठक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता.

शिक्षणाचा बाजार मांडला का ?
बीड : गुरुवारी सायंकाळी पीआरसी सदस्य दिलीप सोपल, विक्रम काळे, दत्तात्रय सावंत यांनी बीड पंचायत समितीला भेट दिली. तेथे तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा किती आहेत? अशी विचारणा केली असता गटशिक्षणाधिकारी मोराळे निरुत्तर झाले. साध्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने शिक्षणाचा बाजार मांडला का ? असा सवाल एका सदस्याने केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी घरकुल योजनेच्या अनुषंगानेही विचारणा करण्यात आली. या समितीने तालुक्यातील पाली, येळंबघाट आणि नेकनूर येथील शाळांची पाहणी केली.

Web Title: Flooding work in Beed district; Bidi rubbish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.