वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 07:10 PM2021-09-28T19:10:08+5:302021-09-28T19:11:38+5:30
flood in Beed : नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला.
परळी : शहर व परिसरात सोमवार पासून मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याने परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच वाण नदीला पूर आल्याने परळी तालुक्यातील वानटाकळी, दौनापूर, नागापूर, पांगरी ,संगम या गावातील नदी, नाले भरून वाहू लागली. या गावचा संपर्कही मंगळवारी पहाटेपासून तूटला होता. वाण टाकळी गावास पाण्याने वेढले होते. परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर व संबंधित अधिकाऱ्यांनी वानटाकळी ला भेटून ग्रामस्थांना आधार दिला. तसेच राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधला व शासनाने तातडीने मदत कार्य करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी रात्री परळी ,अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नागापूर, वानटाकळी जवळ जाणाऱ्या वाणनदीला पूर आल्याने वानटाकळी गावात वाण नदीचे पाणी घुसल्याने गावात हाहाकार उडाला. दहा ही आखाड्यात ही पाणी घुसल्याने वान टाकळी चे शेतकरी पहाटेच्यावेळी चिंचेच्या झाडावरच थांबले होते .पाणी कमी झाल्यानंतर झाडावरून सकाळी खाली उतरले. नागापूरचे वान धरणही ओसंडून वाहत आहेत .नागापूर पुलावरून पाणी वाहिले नागपूर ते मांडेखेल या मार्गावरील संपर्क काही तास तुटला होता.
परळी अंबाजोगाई रस्त्यावरील कनेरवाडी जवळील पुलाचे काम चालू असल्याने पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही वेळ संपर्क तुटला होता त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. परळी अंबाजोगाईला जाण्यासाठी दुसरा मार्ग वाहनधारकांना वापरावा लागला. परळी -बीड राज्य रस्त्यावरील पांगरी पुलास ही पाणी लागले होते.. ओढ्यास वाण नदीचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी सायंकाळी व मध्यरात्री पासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यात शेतीतील सोयाबीन, कापूस, मुग, उडीद आदी उभी पिके जमीनदोस्त झाली असून वानटाकळी, पांगरी गावांना महापुराने वेढा टाकला आहे. ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले होत.. मंगळवारी पंकजा मुंडे तातडीने भरपावसात नागापूर, वानटाकळी, देशमुख टाकळी, पांगरी गावात पोहोचल्या. चिखल तुडवत त्यांनी नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
वाण टाकळी जवळून वाण नदी वाहते. या नदीच्या पात्रा वरून पाणी वाहू लागल्याने हे पाणी वाणटाकळी गावात घुसले त्यामुळे वानटाकळी -दौनापूर चा संपर्क तुटला होता .वानटाकळी गावातील हनुमान मंदिर खंडोबा मंदिर ला पाण्याने वेढले होते.सोमवारी रात्री अकरा वाजता अचानक गावात पाणी घुसले व मंगळवारी दुपारी 12 नंतर पाण्याची उंची कमी झाली. सोमवारी रात्री खंडोबा मंदिर मध्ये नेहमी प्रमाणे झोपण्यास गेलेले ग्रामस्थ ही मंदिरातच अडकून पडले होते वानटाकळी परिसरातील दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे अशी माहिती ग्रामस्थ तुकाराम मुंडे यांनी दिली.
परळी शहरात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने विनाविलंब मदत करावी अशी मागणी तळणी येथील शेतकरी संतोष मुंडे यांनी केली आहे.