जेसीबीवरून फुलांचा वर्षाव, २५० किलोचा हार; मनोज जरांगेंचे तेलगावात जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:44 PM2023-10-03T17:44:23+5:302023-10-03T17:45:38+5:30
बऱ्याच काळाने मराठा समाज एकत्र आला आहे. आता त्यात फुट पडू देऊ नका.
- संतोष स्वामी
दिंद्रुड ( बीड) : आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत बसलेल्या लेकुरवाळ्या महिलांसह तरुणांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला का केला? उपोषणार्थींना रक्तबंबाळ का केले ? याचे उत्तर द्या, असा जाब विचारत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ते मराठा आरक्षण प्रश्नी आयोजित सभेस जाताना तेलगाव येथे बोलत होते.
मनोज जरांगे सध्या राज्य व्यापी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सकाळी साडेनऊ वाजता पालखी महामार्गावरील तेलगाव चौकात हजारोंच्या संख्येने मराठा समाज जरांगे यांच्या स्वागतासाठी एकत्र आला. जेसीबीवरून फुलांचा वर्षाव करत क्रेनच्या साह्याने जवळपास अडीचशे किलोंचा पुष्पहार घालून मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत यावेळी करण्यात आले.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, बऱ्याच काळाने मराठा समाज एकत्र आला आहे. आता त्यात फुट पडू देऊ नका. मराठा समाजाला आता आरक्षण मिळणारच आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबरला संभेसाठी अंतरवलीकडे येताना भावनांचा उद्रेक न करता शांततेत यावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी यावेळी केले.