नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:39+5:302021-06-16T04:44:39+5:30
बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर ...
बीड : सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविडच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल - ३ निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधांमध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरू असल्याने जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दैनंदिन प्राप्त होणाऱ्या अहवालावरून रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये १० जून रोजी १६८ रुग्ण, ११ रोजी १३० रुग्ण, १२ रोजी १८० रुग्ण, १३ रोजी १०८ रुग्ण, तर १५ रोजी १५४ कोविड रुग्ण आढळून आलेले आहेत. सद्यस्थितीत निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून 'कोविडयोग्य वर्तना'चे पालन होत नाही. ते बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने, शासकीय कार्यालयांमध्ये समूहांमध्ये गर्दी करत असल्याने, आवश्यकता नसताना रस्त्यावर समूहांमध्ये उभे राहणे, मास्कचा वापर न करता बाहेर फिरणे इत्यादी कारणांमुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असून यामुळे भविष्यात पुन:श्च कडक निर्बंधांची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, सर्व आस्थापना धारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे, सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समूहामध्ये वावर टाळावा, रेस्टॉरंट, हॉटेल्स ही केवळ पन्नास टक्के उपस्थितीमध्ये निर्देशित केलेल्या वेळेत चालू ठेवण्यात यावीत. अन्यथा संबंधित रेस्टॉरंट, हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
यापुढे रुग्णसंख्या वाढीचा आलेख वाढत राहिल्यास, नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल, तसेच कोविड-१९ विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर शासन नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येईल. वेळेत दुकाने उघडावीत तसेच संध्याकाळी पाचनंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच (वैद्यकीय कारणास्तव) घराबाहेर बाहेर पडावे. संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी लागू आहे, याचे भान ठेवावे. रुग्णवाढीचा दर वाढल्यास शासन निर्देशांनुसार जिल्हा जर स्तर-३ मधून स्तर चारमध्ये गेल्यास, सर्व नागरिकांना पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.