अन्न, औषध प्रशासनाकडून ज्यूस बार, रसवंतीची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:28 AM2019-04-15T00:28:59+5:302019-04-15T00:29:32+5:30
जिल्ह्यात खाद्य बर्फाच्या एकाही कारखान्याला मंजुरी नसताना सर्रास ज्यूस, रसवंतीगृहातून सर्रास अप्रमाणित बर्फ वापरण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर अन्न प्रशासनाने जिल्हाभरात झाडाझडती सुरु केली आहे.
बीड : जिल्ह्यात खाद्य बर्फाच्या एकाही कारखान्याला मंजुरी नसताना सर्रास ज्यूस, रसवंतीगृहातून सर्रास अप्रमाणित बर्फ वापरण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर अन्न प्रशासनाने जिल्हाभरात झाडाझडती सुरु केली आहे. पाच ठिकाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व ऋषिकेश मरेवार यांनी दिली.
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना उन्हापासून बचावासाठी थंडपेयांबरोबरच लिंबू सरबत, ऊसाचा रस, फळांचे ज्यूस, ताक, आईसगोळा इ. च्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. बर्फ टाकून या पदार्थांची विक्री होत असून शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिकांमधूनही याची मागणी वाढली आहे. परंतु, जिल्ह्यात खाद्य बर्फाच्या एकाही कारखान्याला अन्न प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नसल्याताना सर्रास अप्रमाणित बर्फ वापरण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. विशेषत: जिल्ह्यातील बस स्थानकांच्या तसेच शहरांमधील वर्दळीच्या भागातील रसवंती, ज्यूस बारमध्ये बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या बाबीकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
उन्हाळ्याच्या अनुषंगाने जिल्हाभरात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून ज्यूसबारसह इतर काही ठिकाणी तपासणी मोहीम सुरु केली आहे. यामध्ये पाच ठिकाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दुकानदार, व्यापाऱ्यांनाही याबाबत सजग करण्यात येत असल्याचे अन्न प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन भिसे, मरेवार यांनी केले आहे.
आंब्यांच्या साठ्यांचीही पाहणी
आंबे व फळे पिकवण्यासाठी कार्बाईड गॅसचा अथवा पावडरचा वापर रोखण्यासाठीदेखील मोहीम हाती घेण्यात आली आहे. आंब्याच्या साठ्यांना भेट देत व्यापाऱ्यांना कार्बाइड ऐवजी प्रमाणित केलेल्या इथेपॉन पावडरचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी सांगितले.