बीड जिल्ह्यातील पाच गावांत भगरीतून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 05:28 PM2020-02-22T17:28:41+5:302020-02-22T17:30:19+5:30
दीडशे किलो भगर प्रशासनाकडून जप्त
अंबाजोगाई (जि. बीड) : तालुक्यातील देवळा, सारसा व आपेगाव येथील तीन कुटुंबातील बारा जणांना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली होती. त्यानंतर तालुक्यातील सौंदना येथील एकाच कुटुंबातील आठ जणांना तसेच गेवराई तालुक्यातील कोपरा येथील एकाच कुटुंबातील १४ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सौंदना येथील फड कुटुंबियांनी गावातीलच दुकानातून भगर खरेदी केली होती. ती खाल्यानंतर कोमल फड, भाग्यश्री फड, सुग्रीव फड, दत्ता फड , गोविंद फड, कमलाबाई फड, लक्ष्मी फड, महादेव फड अशी विषबाधा झालेल्या रूग्णांची नावे असून सर्व जण ३० ते ६२ वयोगटातील आहेत. स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान गेवराई तालुक्यातील कोपरा येथील एकाच कुटुंबातील १४ जणांना भगरीची भाकर खाल्ल्यामुळे शुक्रवारी विषबाधा झाली. सर्वांना सायंकाळी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशासनाकडून कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने सौंदना येथील किराणा दुकानातून भगरीचे नमुने घेतले असून दुकानातून दीडशे किलो भगर जप्त केली आहे. आपेगाव , देवळा, सारसा येथील विषबाधा झालेल्या रु ग्णांनी सुद्धा लातूर तालुक्यातील सारसा येथून भगर खरेदी केली होती. सौदणा व सारसा येथील किराणा दुकानदारांनी लातूर येथील मे. अमितकुमार अँड कंपनी येथून भगर खरेदी केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकारी अनिकेत भिसे यांनी दिली.