२८ लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:50+5:302021-01-20T04:33:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यातील २८ लाख लोकांची अन्न सुरक्षा पुरेशा मनुष्यबळाअभावी वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यातील २८ लाख लोकांची अन्न सुरक्षा पुरेशा मनुष्यबळाअभावी वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे; मात्र मनुष्यबळ अत्यंत कमी असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेला मर्यादा येत असल्याचे ध्यानात येत आहे.
बीड जिल्ह्यात जवळपास परवानाप्राप्त २२६५, तर नोंदणीकृत १४७४३, असे एकूण १७ हजार ८ असे व्यवसाय आहेत. बीड जिल्ह्यात जवळपास २१०० औषधी दुकाने आहेत आणि निरीक्षक मात्र एकच आहे. औषधी विभागाचे सहआयुक्तांचे पद जवळपास दहा वर्षांपासून रिक्त आहे. यावरून शासनाची या विभागाकडे बघण्याची अनास्था दिसून येते. निरीक्षकच अनेक वर्षांपासून सहआयुक्त आणि निरीक्षकाच्या भूमिकेत आहे.
टार्गेटप्रमाणे तपासणी होते, मनुष्यबळाची अडचण
टार्गेटप्रमाणे प्रत्येक महिन्याला तपासणी करून अन्न विषयक नमुने घेत असल्याचे अन्न प्रशासनातर्फे सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत जवळपास २९०० हाॅटेल्स आहेत. प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही.
मनुष्यबळांचा अभाव, सोयी-सुविधाही नाहीत
जिल्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. निरीक्षकांचे तीन पदे मंजूर असताना फक्त दोनच भरलेली आहेत. वाहन आहे तर चालक नाही. तपासणी करण्यासाठी आहे ते मनष्यबळ खूपच कमी असल्याने अनेक अडचणी येतात.
- इम्रान हाशमी, सहआयुक्त, बीड