‘मन की बात’साठी मजूर रोजगार बुडवून बसले; संवाद न साधताच फोटो दाखवल्याने पदरी निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 01:31 PM2022-04-25T13:31:20+5:302022-04-25T13:32:03+5:30
नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये कड्यातील मजुरांशी करणार होते संवाद
कडा (जि.बीड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ कार्यक्रमात राज्यातून बीड जिल्ह्यातील कडा येथे मजुरीसाठी आलेल्या कामगारांशी चर्चा करणार असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून महावितरण कार्यालयाजवळ नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु, ‘मन की बात’ ऐकायला आलेल्या जनता जनार्दनाची निराशा झाली.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथे मागील अनेक वर्षांपासून शेती कामासाठी जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील मजूर पालात राहात आहेत. त्या मजुरांच्या व्यथा व जीवन जगताना ते करत असलेला संघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर देशमुख यांनी मांडला होता. त्याची दखल घेत २४ एप्रिल रोजी रोजी देशातील अकरा राज्यांतून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील कडाचा समावेश ‘मन की बात’ कार्यक्रमात करण्यात आला होता. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरू होऊन ११:३४ला संपला. यावेळी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमसेन धोंडे, भाजप नेते राजेंद्र म्हस्के, अशोक साळवे, अमोल तरटे, अनिल ढोबळे आदी यावेळी उपस्थित होते.
रोजगार बुडाला, पदरी निराशाच
तुमच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकून घेणार आहेत. रविवारी सकाळी ‘मन की बात’ कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधणार असल्याचे आम्हाला शनिवारपासूनच सांगितले होते. आम्ही १४ कुटुंबांतील लोक रविवारी सकाळपासून कामावर न जाता थांबलो होतो. पण त्या स्क्रीनवर फक्त आम्ही बसलेले दृष्य दिसले. आमच्याशी संवाद साधला नाही. रोजगाराचे काम सोडून थांबवले. पण काहीच बोलणे झाले नसल्याने आमची निराशा झाल्याचे येथील कामगार सर्जेराव शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.