सलग तिसऱ्या दिवशी वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांचे गर्दी उसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:26 PM2023-08-14T17:26:50+5:302023-08-14T17:27:01+5:30
मंदिर परिसराला आले जत्रेचे स्वरूप; सलग तीन दिवासापासून भाविकांच्या रांगा
- संजय खाकरे
परळी( बीड): देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सोमवारी राज्य व परराज्यातील भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. हर हर महादेवच्या जयघोष करीत भाविकांनी रांगेत थांबून शांततेत दर्शन घेतले. आज गेल्या दोन दिवासापेक्षा अधिक गर्दी झाल्याने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसरातील बेलफुल, प्रसाद साहित्य व खेळणीच्या दुकानात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
अधिक मासात भाविकांची संख्या वाढली आहे. शनिवार पाठोपाठ रविवारी व सोमवारी ही श्री वैद्यनाथ मंदिरात भक्तांची रीघ लागली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांची गर्दी होती. धर्मदर्शन व पासधारक अशा दोन रांगा लागल्या होत्या, धर्मदर्शनच्या रांगेत सकाळी 3 तासांनी दर्शन झाले असे नागापुराचे भाविक मनोज यस्के यांनी सांगितले. रविवारी राजस्थान येथील 65 भाविकांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याचे एका भाविकांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील नागपूर, जळगाव व अन्य ठिकाणावरून तसेच इतर राज्यातील व पर राज्यातील भाविकांच्या गर्दीने रविवारी, सोमवारी वैद्यनाथ मंदिर फुलले होते. रविवारी सकाळी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त राजेश देशमुख यांना स्वतः मंदिर गाभाऱ्यात थांबून दर्शन व्यवस्था सुरळीत करावी लागली.
अधिकमासामुळे दर्शनासाठी राज्य व परराज्यातील भाविकांची गर्दी वाढली आहे. शनिवारी, रविवारी व सोमवारी तर भाविकांची मोठी गर्दी श्री वैद्यनाथ मंदिरात झाली होती.
- प्रा. बाबासाहेब वामनराव देशमुख, सचिव, श्रीवैजनाथ देवस्थान ट्रस्ट