महामंडळांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांना भाग पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:48+5:302021-09-03T04:34:48+5:30
आष्टी : आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन ...
आष्टी : आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे तसेच शासनाने मागास समाजातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास मंडळ, खादी ग्रामोद्योग मंडळ तसेच इतर महामंडळांची उद्दिष्टे पूर्ण करावीत, या मागणीसाठी आष्टी तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी उपोषण करण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार महामंडळांकडून लाभार्थी उद्दिष्ट ठरवून दिलेले असते. त्याप्रमाणे बँकांकडे कर्ज प्रकरणे जातात. त्यानंतरही बँक अधिकारी लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन आर्थिक वर्ष संपल्याचे कारण सांगून प्रकरणे परत पाठवतात किंवा वेगवेगळी कारणे देऊन दिशाभूल केली जाते. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्यानंतर २ मार्च रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांना स्मरणपत्र दिले. तरीही वेगळ्या कारणांनी अडवणूक सुरूच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास भाग पाडावे; अन्यथा बँकांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा लालासाहेब शिंदे, संतोष वाघमारे, नागेश डाडर, संदीप साबळे, किशोर जाधव, परमेश्वर शिंदे, रमेश साबळे, जीवन साबळे, मिलिंद उमाप, ज्ञानदेव वाल्हेकर, विकास साळवे, बाबासाहेब शिरोळे आदींनी दिला. दरम्यान, तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
020921\02bed_3_02092021_14.jpg