हरीण शिकार प्रकरणी आष्टीत वन विभागाने दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 09:39 AM2019-09-17T09:39:55+5:302019-09-17T09:47:58+5:30
पथकाने आरोपींकडून मांसही केले जप्त
कडा (बीड ) - सोमवारी रात्री दहाच्या सुमारास सोलापूरवाडी या भागात हरणाच्या कळपावर हल्ला करत एका हरणाची शिकार केल्याप्रकरणी आष्टी येथील वनविभागाने दोघाजणांना मांसासह ताब्यात घेतले आहे. अर्जुन सोनबा कुऱ्हाडे, विठ्ठल किसन खुडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा सोलापुरवाडी या रस्त्यावरून सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हरणाचा कळप जात होता. यातील एका हरणाला जखमी करून त्यांची खाण्यासाठी शिकार केली जात असल्याची माहिती ग्रामस्थानी अंभोरा पोलिसांना दिली.पोलिसांनी वनविभागाला याबाबत कळवले असता त्यांच्या पथकाने लागलीच त्या भागात धाव घेतली. यावेळी अर्जुन सोनबा कुऱ्हाडे, विठ्ठल किसन खुडे यांची चौकशी केली असता त्यांच्या घराच्या समोर हाॅटेलवजा पत्र्याच्या शेडमध्ये हरणाची शिकार करून त्याचे मांस एका जागेवर ठेवल्याचे निदर्शनास आले. पथकाने दोघांना ताब्यात घेत मांस जप्त केले असून गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे, वनपाल सुभाष धसे , महाजन टी.एम. वनरक्षक बाबासाहेब शिंदे, युनुस शेख, सोनकांबळे, जगताप, मालेवार यांच्या पथकाने केली.
हरणाला चारचाकीने उडवल्याचा बनाव
पत्र्याच्या शेडमध्ये पथकाने जाऊन पाहणी केली असता या हरणाला एका चारचाकी गाडीने उडवले यात ते मरण पावले असा बनाव आरोपींनी केला.