जंगलातील आग विझविताना वन कर्मचारी भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:32+5:302021-03-16T04:33:32+5:30
परळी : तालुक्यातील दौनापूर शिवारात जंगलातील झाडास आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली असून, यामध्ये झाडे मोठ्या प्रमाणात जळून ...
परळी : तालुक्यातील दौनापूर शिवारात जंगलातील झाडास आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली असून, यामध्ये झाडे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली असून, आग विझविताना वनविभागाचे दोघेजण भाजले असून, त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
शनिवारी रात्री खासगी शेतकऱ्याच्या बांधास आग लागली होती. या आगीचे लोळ हवेबरोबर रविवारी सकाळी दौनापूर शिवारातील जंगलात पसरले. या आगीमुळे जंगलातील झाडे मोठ्या प्रमाणात जळाली आहेत. रविवारी सकाळी तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी वनपाल राठोड व अंगद मुंडे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती वनविभागाच्या परळी येथील कार्यालयातून मिळाली. परंतु वनविभागाचे किती नुकसान झाले, किती झाडे जळाली, याविषयी अधिक माहिती सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होऊ शकली नाही