निजामकाळातील बनावट दस्तऐवजांचा होतोय वापर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 09:36 AM2022-05-12T09:36:12+5:302022-05-12T09:36:17+5:30

वक्फ जमीन घोटाळा : मालकी हक्काची होणार पडताळणी, पथक रवाना

Forged documents of Nizam period are being used? | निजामकाळातील बनावट दस्तऐवजांचा होतोय वापर?

निजामकाळातील बनावट दस्तऐवजांचा होतोय वापर?

googlenewsNext

- संजय तिपाले 
लोकमत न्यूज नेटवर्क 
बीड : वक्फ बोर्डच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची भूमाफियांनी अक्षरशः विल्हेवाट लावली, या प्रकरणी सात गुन्हे नोंद आहेत. खिदमतमास व मदतमास जमिनींचे बेकायदा हस्तांतरण करण्यासाठी निजामकालीन बनावट दस्तऐवजांचा वापर केल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी हैदराबादला रवाना झाले.  

जिल्ह्यात    वक्फ बोर्डच्या मालकीची २७ हजार हेक्टर जमीन आहे. भूमाफियांनी यातील काही जमिनी गिळंकृत केल्याचे उजेडात आले. या प्रकरणी आतापर्यंत आष्टी ठाणे दोन, अंभोरा, बीड शहर, शिवाजीनगर, बीड ग्रामीण व दिंद्रूड या ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. राज्यात सर्वाधिक गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.  
यात दोन तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या काही बड्या मंडळींचीही नावे एफआयआरवर आहेत. तथापि, महसूल विभागाकडून  गुन्हे नोंद झालेल्या  जमिनींशी संबंधित दस्ताऐवज मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर वक्फ बोर्ड हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी वक्फ बोर्डाकडील निजामकालीन दस्तऐवज मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी बुधवारी एक पथक हैदराबादला रवाना केले आहे. 

 या पथकामार्फत बीड शहर, बीड ग्रामीण, शिवाजीनगर व  दिंद्रूड या चार ठिकाणच्या गु्न्ह्यांसंदर्भात  खरेदी-विक्री व्यवहाराचे मुंतखब (निजामकालीन दस्तऐवज) तपासण्यात येणार आहेत. हे दस्तऐवज उर्दूतील आहेत. या दस्तऐवजांआधारेच वक्फ बोर्डच्या जमिनींचे हस्तांतरण करण्यात आले. मात्र, ते दस्तऐवज बनावट आहेत की खरे, याची पडताळणी करण्यात येणार आहे.     

मुंतखब म्हणजे काय? 
जमीन इनाम म्हणून देताना जी सनद दिली जाते त्याला मुंतखब म्हटले हाते. त्यावर देणाऱ्याचे तसेच स्वीकारणाऱ्याचे नाव, गट क्रमांक,   तसेच गावाचे नाव आणि चतु:सीमा असते. ती सनद म्हणजेच रजिस्ट्री असल्याचे समजले जाते. निजामकाळात मुंतखब हेच रजिस्ट्री दस्तऐवज होते.

वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रांसाठी हैदराबाद येथे पथक पाठविले आहे. या संदर्भात अधिकाधिक पुरावे गोळा करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. 
- हरिभाऊ खाडे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड
 

Web Title: Forged documents of Nizam period are being used?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.