आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी बीडमधील भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 03:33 PM2021-12-21T15:33:09+5:302021-12-21T15:34:42+5:30

health department paper leak case पुणे पोलिसांची कारवाई, चौकशीला म्हणून बोलावले अन् ताब्यात घेतले

Former BJP office bearer in Beed arrested in health department paper leak case | आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी बीडमधील भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी बीडमधील भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात

Next

- सोमनाथ खताळ
बीड : आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात (health department paper leak case) बीडमधील भारतीय जनता ( BJP ) युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी संजय सानप याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीसाठी पुण्यात गेल्यावर त्याचा सहभाग आढळल्याने पुणे सायबर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आता या प्रकरणात आरोपींची संख्या १८ झाली आहे. संजयच्या संपर्कात असलेले आणखी सहा जण रडारवर असल्याचे समजते.

३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट ड परीक्षेचा पेपर फुटला होता. यात मास्टरमाईंड असलेले लातूरचे उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, आरोग्य अभियानचा सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यासह १७ जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत. यात बीडमधील रहिवाशी असलेल्या ७ लोकांचा समावेश आहे. आता आठवा संजय सानपही जाळ्यात अडकला आहे. त्याला या प्रकरणात चौकशीसाठी पुण्याला बोलावले होते. यात अगोदरचा आरोपी असलेला राजेंद्र सानप याच्या संपर्कात राहून काही पुरावे हाती लागल्याने संजयलाही सोमवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढत चालली असून, यात आता पुढचा क्रमांक कोणाचा, याकडे लक्ष लागले आहे.

'न्यासा' कंपनीही संशयाच्या भोवऱ्यात
टीईटी परीक्षेत जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याचा सहभाग आढळला होता. तसाच सहभाग आता आरोग्य विभाग भरतीचे कंत्राट दिलेल्या न्यासाचाही असण्याची शक्यता आहे. न्यासा कंपनीचे दोन लोक बीडमध्ये गट क व ड चा पेपर घेऊन आल्याची चर्चा आहे. नगर रोडवरील एक व अंबिका चौकातील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात त्यांनी शाळा भरवून प्रश्नांची उत्तरे सांगितल्याची चर्चा आहे.

वाद घालणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रडारवर
जिल्ह्यातील संशय असलेले तीन कर्मचारी रजेवर गेले आहेत. यात पाटोदा तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वीच आपल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत वाद घातला होता. पेपर फुटण्याच्या काही दिवस अगोदर या डॉक्टरसोबत झालेले संभाषण पुरावा म्हणून ताब्यात घेणार आहेत. याच कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधिकाऱ्यालाही अडचणीत आणले असून, त्यांनाही ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. रविवारी पुणे पोलिस वैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती घेऊन व वडझरीला येऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

संजय सानप हा चौकशीसाठी पुण्यातच होता. राजेंद्र सानप सोबतचा संवाद आणि इतर काही पुरावे मिळाल्याने त्याला अटक केली आहे.
- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे

Web Title: Former BJP office bearer in Beed arrested in health department paper leak case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.