माजी मंत्र्याची मुले, महाविद्यालये, बँका, उद्योजक अन् व्यापारी महावितरणचे बडे थकबाकीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:56 PM2019-09-20T16:56:22+5:302019-09-20T16:58:11+5:30
महावितरणतर्फे कारवाईची धडक मोहीम
बीड : महावितरणची १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांची यादी काढली असता यामध्ये माजी मंत्र्याची मुले, बँका, उद्योजक, व्यापारी आदींची नावे समोर आली आहेत. या सर्वांची यादी तयार करून महावितरणने आता वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी ११६ ग्राहकांची वीज तोडली आहे. विशेष म्हणजे बड्या असलेल्या ६४६ ग्राहकांकडे तब्बल १४ कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती गुरूवारीसमोर आली आहे.
बीड जिल्ह्यात महावितरणचे जवळपास २ लाख ४० हजार ग्राहक आहेत. वीज वापर करूनही बिले भरण्यास ग्राहक उदासीन असल्याने थकबाकीचा आकडा अब्जावधीच्या घरात गेला आहे. हाच धागा पकडून महावितरणने आता कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. दोन टप्पे केले असून पहिल्या टप्प्यात एक लाखांपेक्षा जास्त आणि दुसऱ्या टप्प्यात ५० हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
घरगुती आणि व्यवसायासाठी वीज वापर करून बिले न भरणाऱ्या ११६ ग्राहकांचा वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला. कारवाईची मोहीम हाती घेताच ६२ ग्राहकांनी तात्काळ महावितरणकडे धाव घेत थकबाकी भरल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, महावितरणकडून या कारवाईत किती सातत्य राहते आणि दुजाभाव न करता पारदर्शकपणे कारवाया करण्याचे आव्हान असणार आहे. सर्व थकबाकीदारांमध्ये धनदांडग्यांचा समावेश आहे. राजकीय दबाव, गुंडगिरी करून कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांर दबाव आणला जात असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हे सर्व झुगारून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
१५ पथके आठवड्यात करणार मोहीम फत्ते
महावितरणने बड्या थकबाकीदारांविरोधात कारवाया करण्यासाठी जिल्ह्यात १५ पथके नियूक्त केले आहेत. यामध्ये एका अभियंतासह तांत्रीक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अवघ्या आठवडाभरात हे पथके मोहीम फत्ते करणार असल्याचा विश्वास अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी व्यक्त केला आहे.
पेठबीडमध्ये पथकाला शिवीगाळ
१ लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या पथकाला ग्राहकाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे. धनदांडग्या व गुंड ग्राहकांवर कारवाई करण्याचे आव्हान या पथकांसमोर आहे.
मंत्र्यांची महाविद्यालये, माजी मंत्र्यांच्या मुलांकडेही लाखोंची थकबाकी
महावितरणच्या बड्या थकबाकीदारांच्या यादीमध्ये माजी मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. तसेच काही शासकीय अधिकाऱ्यांचे क्वार्टर्सचाही समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
१ लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या ६४६ ग्राहकांची यादी तयार करून वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी ११६ जणांवर कारवाई केली. ६२ ग्राहकांनी पैसे भरले आहेत. आठवड्यात या कारवाया होतील. त्यानंतर ५० हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांवर कारवाई करणार आहोत.
- संजय सरग,अधीक्षक अभियंता, महावितरण बीड