आधी पत्नी, दोन मुलांची केली निर्घृण हत्या;आता पॅरोलवर सुटल्यास स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:54 PM2022-03-07T13:54:24+5:302022-03-07T13:54:48+5:30
आजार आणि मानसिक त्रासातून घरात गळफास घेऊन केली आत्महत्या
गेवराई (बीड) : जन्मठेपेच्या शिक्षेत पॅरोलवर जेल बाहेर आलेल्या एका कैद्याने माऊली नगर येथील घरात आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. सुनील दामोदर गायकवाड असे मृत कैद्याचे नाव आहे. गायकवाड याने आजाराने व मानसिक त्रासानतून आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.
दहा ते बारा वर्षांपूर्वी सुनील गायकवाड याने पत्नी,दोन मुलांचा कात्रीने वार करून निर्घृणपणे खून केला होता. तर एक मुलगी बचावली होती. याप्रकरणी गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून गायकवाड जेलमधून पॅरोलवर घरी आला होता. त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते, शिवाय पोटाचा आजार देखील बळावला होता. यातूनच गायकवाड याने रविवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी घरातील इतर जागे झाल्यानंतर गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिस नवनाथ गोरे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात काही नोंद नव्हती.