चार कोटींचे अवैध गौण खनिज उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:11 AM2019-09-26T01:11:08+5:302019-09-26T01:11:53+5:30
अवैधरित्या ४ कोटी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी रेल्वे रुळाचे काम करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी अवैधरित्या ४ कोटी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी रेल्वे रुळाचे काम करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड - परळी रेल्वे मार्गाचे काम बीड शहराजवळील पालवण शिवारात सुरु आहे. याच ठिकाणी नियोजित रेल्वे स्थानकाचे काम सुरु असून, यासाठी लागणा-या रोडा बिंदुसरा नदीपात्रातून अवैधरीत्या उत्खनन करुन आणला जात होता. या संदर्भात अनेकांनी जिल्हाधिकारी, गौण खनिज अधिकारी यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली होती. या तक्रारीवरुन गौण खनिज अधिकारी आनंद पाटील, बीडचे तलाठी पी. एस. आंधळे, एस. डी. सानप व मंडळ अधिकारी पी. के. राख यांनी बिंदुसरा नदीपात्रात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना अंदाजे १ लाख ब्रास रोडा उत्खनन केल्याचे दिसून आले.
विचारपूस केली असता हा रोडा रेल्वेच्या कामासाठी घेऊन जात आहोत असे सांगण्यात आले. या संदर्भात आपल्याकडे परवाने आहेत असे सांगण्यात आले. मात्र, पाहणी केली असता कोणतीही परवानगी उत्खननासाठी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा पाटील यांच्या फिर्यादीवरुन पी.व्ही.आर. कंपनीचे संस्थापक पी. व्ही. राम, मॅनेजिंग डायरेक्टर पी. श्रीधर, मॅनेजर मतय्या, सुपरवायजर पालेगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि सुजित बडे हे करीत आहेत.
सहा हायवा केले जप्त
बीड तहसील कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यास गेले असता त्यांना सहा हायवामध्ये उत्खनन केलेला रोडा दिसून आला. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत.