‘ओडीएफ प्लस ’ मानांकन स्पर्धेत जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती उतरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:40 AM2021-08-18T04:40:29+5:302021-08-18T04:40:29+5:30
बीड : हागणदारीमुक्त गाव, स्वच्छ सर्वेक्षण, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान असे विविध स्वच्छतेचे उपक्रम आयोजित केल्यानंतर जिल्ह्यातील चार ...
बीड : हागणदारीमुक्त गाव, स्वच्छ सर्वेक्षण, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान असे विविध स्वच्छतेचे उपक्रम आयोजित केल्यानंतर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींनी हागणदारीमुक्तीपेक्षा अधिक (ओडिएफ प्लस) अशाप्रकारचे केंद्राच्या विशेष मानांकन प्राप्त करण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १५ ऑगस्ट रोजी या ग्रामपंचायतींनी स्वयंघोषणापत्र जाहीर केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हागणदारीमुक्त ग्रामपंचायत अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर शौचालयाचा वापर, स्वच्छतेच्या सवयी, शाळा-अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयात शौचालय, लहान मुलांच्या बाबतीत व्यवस्थापन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालय सुविधा प्राप्त झालेल्या बीड तालुक्यातील कोळवाडी व सांडरवन, केज तालुक्यातील मस्साजोग, धारूर तालुक्यातील सावरगाव या ग्रामपंचायतींनी हागणदारी मुक्तीपेक्षा अधिक (ओडीएफ प्लस) घोषित केले आहे.
केंद्र शासनाच्या या विशेष मानांकनात या ग्रामपंचायतींचा समावेश झालेला आहे. या ग्रामपंचायतींची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करावयाची असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता यांच्या विभागामार्फत या ग्रामपंचायतींची पडताळणी करून अंतिम घोषणा करण्यात येणार आहे.
हे मानांकन मिळणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सर्व उपक्रम सातत्याने सुरू असून घनकचरा व सांडपाणी या महत्त्वाच्या कामात घनकचरा वर्गीकरण या कामात अग्रेसर आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती टप्प्याटप्प्याने या मानांकन उपक्रमात सहभागी होणार असल्याने घनकचरा व सांडपाणी तसेच सार्वजनिक शौचालय मंजूर झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश अगोदर होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी दिली आहे.