धाक दाखवून लुटणारे चौघे तासाभरात गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:40 AM2018-08-20T00:40:43+5:302018-08-20T00:41:28+5:30
गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ सापळा लावून अवघ्या तासाभरातच चारही लुटारूंना बेड्या ठोकल्या.
बीड : गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ सापळा लावून अवघ्या तासाभरातच चारही लुटारूंना बेड्या ठोकल्या.
शनिवारी रात्री १२ वाजता बायपास रोडवर ही घटना घडली होती. दरम्यान, बीड ग्रामीण ठाण्यात आणल्यानंतर या चारही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात ते अयशस्वी ठरले.
सचिन विश्वनाथ पाटोळे, सचिन हिरामन गायकवाड, किरण मोहन कसबे, नितीन संजय भालेराव [सर्व रा. रमाई चौक, खंडेश्वरी रोड, बीड] अशी आरोपींची नावे आहेत. अक्षय राऊत [रा. नांदलगाव, ता. गेवराई] हा बीडमध्ये एका किराणा दुकानावर काम करतो. शनिवारी पगार झाल्यानंतर आपल्या मित्रासह तो गावाकडे निघाला. बीड बायपासवर त्याला चौघांनी अडविले. वस्तºयाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख १० हजार रुपये व मोबाईल घेऊन ते पसार झाले. त्यानंतर राऊत याने तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले.
त्यानंतर पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पेठबीडचे पो. नि. बी. एस. बडे यांनी तात्काळ चक्रे फिरवली. अवघ्या तासाभरात त्यांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. बडे, सुलेमान, स.पो.नि. गजानन जाधव, दिलीप तेजनकर, शीतलकुमार बल्लाळ, पी. एस. साळवे, एस. यू. अलगट, के. आर. जाधव, एल. आर. राठोड, आर. ए. पाईकराव, साजेद पठाण, नसीर शेख, अंकुश महाजन, बीड ग्रामीण, बीड शहर, पेठ बीड व गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक यांनी केली.
अन् पोलिसांनी पाठलाग करुन पकडले...!
चारही आरोपींना पकडून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाण्यात आणल्यानंतर या चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिघे ठाण्याच्या परिसरात ताब्यात घेतले. परंतु नितीन भालेराव हा बुंदेलपुरा भागात पळाला. येथे एका नालीत पाय अडकून पडल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. पाठलाग करताना स.पो.नि. शीतलकुमार बल्लाळ हे सुध्दा किरकोळ जखमी झाले. या चौघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुचाकीच्या क्रमांकावरुन काढला शोध
रक्कम घेऊन पसार होताना अक्षयने चोरट्यांच्या दुचाकीचा नंबर लक्षात ठेवला. तोच पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांना तपास कामात मदत झाली.